वर्तमानपत्रे रद्दी म्हणून विकली जातात,भंगारवाला धातूच्या वस्तू आणि काच विकत घेतो आणि जुन्या कपड्यांना बोहारीण भांडीरूपी पैसे देतेच की !
म्हणजे यातून असा मथितार्थ निघतो की --- नको असलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी सामान्य माणसाला पैसे मिळाले, तरच तो हे काम करेल !--- दाम करी काम असे म्हटले जाते, ते काही खोटे नाही. कुठल्याही सरकारी माणसाला हे काही वेगळे पटवून द्यायला नको.
मग गरीब बिचाऱ्या बेरक्या सामान्य माणसानेसुद्धा तसेच म्हटले, तर त्यात वावगे काय आहे ? एखादा प्रश्न सोडवायचे साम, दाम आणि दंड असे तीन मार्ग असतात. ह्या पर्यायांपैकी, 'दाम' पर्यायाचा अर्थ आपण फक्त पैसे घेणे असाच गृहीत धरतो. पैसे घेण्याऐवजी जो माणूस वापरलेल्या वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करेल त्याला पैसे देण्याचा विचारपूर्वक अवलंब केल्यास प्रश्न सुटू शकतात.
क्षणभर आपण अशी कल्पना करू या की, एखाद्या नगरपालिकेला माझे म्हणणे पटले, तर त्या गावात, वापरून झालेल्या विविध वस्तूंची ‘कलेक्शन सेंटर्स’ उघडलेली दिसतील आणि त्या 'कलेक्शन सेंटर'वरील माणूस पैसे घेण्याऐवजी, पैसे देताना आपल्याला दिसेल.
वापरून झालेल्या आणि नको असलेल्या वस्तूंचा प्रश्न एकदा सुटला की प्रश्न उरेल नको असलेल्या जैविक वस्तूंचा. हा प्रश्न खरे तर फार गहन नाही. कारण हे काम निसर्ग अगोदरच करत आहे. तुम्ही करा अथवा करू नका, सर्व जैविक पदार्थांचे मातीत रूपांतर करण्याचे काम निसर्ग अनादी-अनंत कालापासून करतच आहे. आपले काम आहे, त्याला मदत करायचे. निसर्गाला मदत हीसुद्धा हास्यास्पदच कल्पना आहे. निसर्गाला मदत असे न म्हणता त्याच्या बरोबरीने चालायची सवय आपल्याला करायची आहे. माती हे प्रत्येक सजीवाचे अंतिम स्थानक आहे. जैविक कचरा हा खरोखरच जिवंत कचरा आहे. जिवंत अशासाठी की, त्यात प्रचंड ऊर्जा साठलेली आहे. जैविक पदार्थांचे मातीत रूपांतर होते, तेव्हा ह्या ऊर्जेमुळे उत्कृष्ट प्रकारची खतयुक्त माती तयार होते.
प्रत्येक घरामध्ये जसे देवघर असते, तशी १५ इंच X ११ इंच x ९ इंच ह्या मापाची सर्व बाजूंनी जाळीदार असलेली प्लॅस्टिकची टोपली बसवली, तर त्या टोपलीमध्ये साधारण पाच माणसांच्या कुटुंबातून निर्माण होणाऱ्या जैविक पदार्थांचे रूपांतर उत्कृष्ट गांडूळखतात करता येते. प्रत्येक घरातून जर असे गांडूळखत निर्माण होत असेल, तर ती त्या नगराची संपत्तीच असेल. रासायनिक खत-कारखाने उभारण्यासाठी आणि ते चालविण्यासाठी अनंत कोटी रुपये खर्च होत असतात. त्यातील थोडीशी जरी रक्कम ह्या घराघरांत लावलेल्या गांडूळखत प्रकल्पांना दिली, तर सामान्य माणसे दामाच्या प्रलोभनाला आकृष्ट होऊन हिरिरीने घराघरांमध्ये गांडूळखत प्रकल्प सुरू करतील.