पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

छोटा प्लॅस्टिक उत्पादक, जो दहा माणसांना कामाला लावून दहा कुटुंबांचा उदरनिर्वाह निर्माण करत असतो, त्याला मोठा गुन्हेगार ठरवून सर्वांत जास्त दंड केला जातो. जो दुकानदार गिऱ्हाइकांच्या सोयीसाठी प्लॅस्टिकची पिशवी देतो, त्याला दोषी ठरविले जाते आणि जो सामान्य माणूस प्लॅस्टिकची पिशवी वापरून झाली की गुपचुपपणे स्वच्छ न करता वाट्टेल तिथे टाकून देतो, तो मात्र सभ्यपणे कॉलर ताठ ठेवून समाजात उघडपणे वावरत असतो. पाउचमधील मसाला तोंडात भरून पाउच रस्त्यावर टाकणारा गुन्हेगार, का पाउचमध्ये माल भरणारा कारखानदार गुन्हेगार ? हेच आपल्याला ठरविता येत नाही.
 आपले वागणे किती विचित्र असते बघा.. सकाळी उठून सगळ्या गावातून घंटा वाजवत थोडा-थोडा करत प्रथम आपण कचरा गोळा करतो आणि मग त्याच कचऱ्याच्या ढिगासमोर बसून ........ "अरे बाप रे केवढा मोठा हा प्रश्न ? आता हा कचरा कसा नष्ट करायचा ?" यावर खल करत बसतो. कचऱ्याचा जन्म जेथे होतो, तेथेच त्याचा नाश नाही का करता येणार ?.. नक्कीच येईल.
 समजा, जर एखाद्या नगरपालिकेने असे जाहीर केले की ... नागरिकांनी केलेली घाण नेणे हे आमचे कामच नाही. आम्ही घेऊन जाणार त्या नागरिकांच्या वापरून झालेल्या, त्यांना नको असलेल्या वस्तू. आम्ही या वस्तू तेव्हाच स्वीकारू, जेव्हा त्या व्यवस्थित वर्गीकरण केलेल्या आणि स्वच्छ स्वरूपात असतील.... असे जर झाले, तर काय होईल ?
 -- स्वच्छ कपडे घातलेला एक माणूस दारावरील बेल वाजवेल, दार उघडले की तो म्हणेल, "बाई, मला तुमच्याकडील तुम्हांला नको असलेल्या आणि स्वच्छ केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या द्या."
 -- दुसरा येईल तो म्हणेल, "मला तुमच्याकडील तुम्हांला नको असलेल्या आणि स्वच्छ केलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, रेझर, सेल्स पिना, पेन्स, रिफिल्स इत्यादी इत्यादी वस्तू द्या."
 -- तिसरा माणूस येईल तो म्हणेल, --- "काल तुम्ही हॉटेलमधून ॲल्युमिनियमच्या कटोरीतून गरमगरम भाजी मागविली होतीत. ती स्वच्छ केलेली कटोरी मला द्या."

 कचऱ्याच्या कुंडीत पडणाऱ्या कचऱ्याचे आपण जर नीट निरीक्षण केले, तर त्यात ठरावीक वस्तूच सापडतील. आपल्याला कधी त्या कुंडीत कालचे वाचून शिळे झालेले वर्तमानपत्र सापडणार नाही. कधी लोखंड आणि इतर धातूंचे सामान सापडणार नाही. दारू आणि बिअर यांच्या बाटल्या कधी कचऱ्यात पडलेल्या दिसणार नाहीत, तसेच आपले वापरून झालेले जुने कपडे कधी कोणी घंटा गाडीत टाकत नाहीत. असे का बरे असते ? या प्रश्नाचे अगदी सोपे आणि सरळ उत्तर आहे... या वस्तूंना बाजारात किंमत मिळते.


दर्जेदार कचरा - दाखवाल का निर्माण करून ? * २९