पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६. दर्जेदार कचरा - दाखवाल का निर्माण करून ?

 रोजच्या जगायच्या धावपळीत प्रत्येक माणसाकडून जो कचरा निर्माण होतो, त्याच्या निर्मूलनाच्या प्रश्नाशी आपल्याला सतत झगडावे लागत आहे. जेव्हा कचरा निर्माण होतो, तेव्हाच जर तो नाहीसा केला, तर प्रश्न चुटकीसरशी सुटेल.
 कचरा निर्मूलन म्हणजेच स्वच्छता. आपण जर संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास घेतला, तर कचरा निर्मूलन आपोआपच होणार आहे. एकदा का स्वच्छता आपल्या अंगी भिनली की आपोआप चांगले विचार येतील. चांगल्या विचारांच्या मागोमाग समृद्धी येईलच येईल.
 खरे तर कुठलीही गोष्ट कचरा अशी नसतेच. आपल्याला नको असलेल्या वस्तू बेजबाबदारपणे वाट्टेल तशा टाकून देण्याच्या सवयीमुळे कचरा निर्माण होतो. हा कचरा आपणच करत असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाची (विल्हेवाटीची) जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, ही साधी गोष्ट आपण जाणीवपूर्वक विसरतो.
 कचरा व्यवस्थापनाच्या कुठल्याही चर्चासत्रात -"हे असं.. असं .. करायला पाहिजे - असे, दुस-यांनी काय करायला पाहिजे, याबद्दलच सतत बोलले जाते. - "मी हे असे.. असे केले आहे." - असे सांगणारे फारच कमी असतात. कचऱ्यासंबंधी, असे सांगण्यासारखे काहीतरी मी करू शकतो का ? ह्या विचारांतूनच - शून्य कचरा - ह्या संकल्पनेचा जन्म माझ्या मनात झाला. जसे ठरवले, तसे मी वागू लागलो.
 - शून्य कचरा - ही फक्त कल्पनाच असू शकेल असे सर्वांप्रमाणे मलाही वाटायचे. पण विचार आणि त्याप्रमाणे आचरण केल्यास ही अशक्य वाटणारी कल्पना, सहज शक्य होऊ शकते, हे मी अनुभवत आहे. यासाठी लागतात रोजची फक्त दहा ते पंधरा मिनिटे. 'कचरा' - नव्हे; नको असलेल्या वस्तू, त्या वापरून झाल्या की स्वच्छ करावयाच्या, त्यांचे वर्गीकरण करायचे, चांगल्या स्वरूपातील नको असलेल्या वस्तू पुनःप्रक्रियेसाठी द्यायच्या आणि गांडुळांच्या साह्याने जैविक वस्तूंचे रूपांतर मातीत करायचे. एवढे जर प्रत्येकाने केले, तर रोज घराघरांतून निर्माण होणा-या नको असलेल्या वस्तू नाहीशा होतील आणि शहरांतून कोप-याकोप-यांवर ओसंडून वाहणाच्या कच-याच्या कुंड्या दिसेनाशा होतील. घंटागाडी ज्या वेळी घंटा वाजवत रस्त्यारस्त्यांवरून फिरते, त्या वेळी ती माणसांच्या चुकीच्या वागण्याचा डंका पिटत गावभर फिरत आहे, असे मला वाटते.

 प्लॅस्टिकबद्दल आपण सतत तकरार करत असतो.प्लॅस्टिकमुळे कचरा होतो, हाही एक चुकीचा समज समाजात पसरवला जात आहे. प्लॅस्टिकसारखा बहुगुणी पदार्थ नाही. प्लॅस्टिकचा नाश होत नाही, म्हणजेच त्याला अमरत्वाचे देणे लाभले आहे. त्याच्या ह्या गुणाकडे आपण दोष म्हणून बघत आहोत. आपली सारी रीतच न्यारी.


२८ * शून्य कचरा