पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्लॅस्टिकची पिशवी देण्याऐवजी एका चांगल्या पिशवीत ही भाजी घालून दिली अन् म्हणाली, “भाजीचे १५ रुपये आणि पिशवीचे १५ रुपये. ३० रुपये द्या. पिशवी परत घेऊन या अन् १५ रुपये घेऊन जा. प्रत्येक भाजीवाली असे म्हणू लागली, तर आपण काय करू ?
 म्हणजे वापरा अन् फेकून द्या' ही मार्केटिंगच्या लोकांनी रुजवलेली कल्पना वापरलेल्या वस्तूंचे कचऱ्यात रूपांतर करायला कारणीभूत आहे असे दिसते. पॅकिंग मटेरिअल अत्यंत कमी किमतीचे, पण आकर्षक बनवायचे असा सर्व कंपन्यांचा प्रयत्न सतत चालू असतो. त्याऐवजी पॅकिंग मटेरिअल महागच वापरायचे की जेणेकरून त्याचा वापर करून झाल्यावर त्याला किंमत येईल. त्या वस्तूपासून पैसे मिळतात, हे लक्षात येताच माणसे ते पॅकिंग मटेरिअल, ती वेष्टणे रस्त्यावर टाकणार नाहीत.
 महागडे चॉकलेट प्लॅस्टिकच्या सुंदर कागदात पॅक करून विकण्याऐवजी चांगल्या डबीतून विकले, तर काय हरकत आहे. डबी परत, तर पैसे परत; किंवा डबीला भंगारमध्ये किंमत येऊ लागली, तर रॅपरने निर्माण होणारा कचरा निर्माण होणार नाही.
 पाण्याची बाटली इतकी पातळ का करायची ? चांगली मजबूत टिकाऊ केली, तर पाणी पिऊन झाल्यावर लोक तिला इकडेतिकडे टाकून देणार नाहीत, फुकट मिळायला पाहिजे असे पाणी जी माणसे विकत घेतात, ती माणसे १० रुपयांऐवजी थोडे जास्त पैसे द्यायला कुरकुरणार नाहीत. वापरून झालेल्या बाटलीचे पैसे मिळतात, हे समजल्यावर महागाई होते म्हणून तकरार करायचा प्रश्नच येत नाही.
 रस्त्यावर पडणाऱ्या प्लॅस्टिककडे जरा बारकाईने बघितले, तर असे लक्षात येईल की, हे प्लॅस्टिक सुस्थितीत आणि सधन असणाऱ्या मंडळींकडूनच फेकले गेलेले आहे, त्यामुळे वेष्टणे चांगली बनविली, तर वाढणाऱ्या किमतीमुळे आरडाओरडा नक्की होणार नाही.
 बायो डिग्रेडेबल रॅपर्स बनविण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, असे काही मोठ्या कंपन्या प्रौढीने सांगतात. खरे तर त्यांचा प्रयत्न चालू असतो पॅकिंग मटेरिअल आणखी स्वस्त कसे बनेल याचा. आम्ही निसर्गाची काळजी घेतो, असे प्रौढीने म्हणणाऱ्या या कंपन्या त्यांच्या रॅपर्समध्ये असे आमूलाग्र बदल करतात का ? खरवस विकणाऱ्या एका साध्या दुकानदाराने जे करून दाखविले, ते या मोठ्या कंपन्या आपणहून करतील का, खचितच नाही, त्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे.

 पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या बनविणारे कारखाने बंद करण्याऐवजी त्यांना जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवायला लावले पाहिजे. आपला माल चांगला राहावा, खुलून दिसावा, बरेच दिवस टिकावा म्हणून उत्पादक पॅकिंगची खूप काळजी घेतात,


२६ * शून्य कचरा