पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"आता माझे काय करणार ? चहा झाला. आता मी कचराच ना ?" चहाची पूड जणू काही माझ्याशी बोलत होती.
 “हो, हो; तू आता कचराच, पण तुला मी आता तशीच सोडणार नाही. तुझ्यात मुरलेला साखरेचा गोडवा कमी करून मगच तुला मी डस्टबिनमध्ये टाकणार. असे केल्याने तुला मुंग्या चावणार नाहीत. काय, बरोबर की नाही ?' चहाची पूड माझ्याकडे बघून गोडशी हसली. भांडे किती मोठे घ्यायचे हे ठरणार होते. मी एका भांड्यात पाणी भरून घेतले. त्या भांड्यावर चहाची पूड असलेले गाळणे ठेवले. आता चहाची पूड भांड्यातील पाण्यात बुडणार होती, तिचा गोडवा पाण्यात उतरणार होता. कचऱ्याच्या एका बादलीत मी ती चहाची पूड टाकली. चहाचे भांडे विसळून झाले होते. शेजारीच शिळ्या दुधाचे पातेले आता मला विसळून स्वच्छ केव्हा केलं जातंय' याची वाट पाहत होते. मी पातेले हातात घेतले. याला असेच सरळ विसळले, तर सर्व साय गटारात जाणार होती. म्हणून चमचा घेतला आणि सर्व साय खरवडून काढली. कितीही खरवडले, तरी पातेले काही पूर्णपणे सायमुक्त होत नव्हते. म्हणजे काही प्रमाणात साय कचरा बनून गटारात जाणार होती. मला ती तशी जाऊ द्यायची नव्हती. प्रश्न असेल आणि तो सोडवायची इच्छा असेल, तर उत्तर सापडते. पातेले स्वच्छ करण्यासाठी मला अशी कोणतीतरी पावडर पाहिजे होती की, जी सायीला खराब न करता पातेल्यापासून वेगळे करणार होती. उत्तर म्हणून मला कालची उरलेली पोळी सापडली. दुधाच्या पातेल्यात मी पोळी कुस्करली. थोडीशी साखर टाकली. साखर आणि शिळ्या पोळीच्या चुन्याने सर्व साय निघून आली. त्या एका पोळीचा छोटासा लाडू बनवला. आता दुधाचे पातेले फक्त विसळायचे बाकी होते.
 सकाळच्या नाश्त्याचा जंगी बेत होता. शिवाय सुट्टी असल्यामुळे स्वयंपाकघरात माझी अन् मुलांची सत्ता होती. नाश्त्याला कांदा-बटाटा पोहे करायचे ठरले. लागणारे सर्व सामान टेबलावर जमा झाले. या पदार्थांतील आम्हाला पाहिजे असलेले भाग काढून घेतल्यानंतर, पोह्याचा चुरा, कांद्या-बटाट्याची सालं, कोथिंबीर आणि कढीपत्त्याच्या काड्या, मिरचीची देठे, नारळाची करवंटी ह्या पदार्थांचा ढीग टेबलावर जमला. हा ढीग जोपर्यंत टेबलावर आमच्यासमोर होता, तोपर्यंत तो कचरा नव्हता. या ढीगाला कचऱ्याच्या टोपलीत लोटण्याची क्रिया होताच, त्यावर टाकाऊ' असे लेबल लागणार होते. परिस्थिती सत्य होती.

 बटाट्यावर साले होती म्हणून आपल्याला चांगला बटाटा मिळत होता. कढीपत्ता आणि कोथिंबीर यांच्या काड्यांनी आजपर्यंत पानांना धरून ठेवले होते. देठ होते म्हणून मिरची वाढली होती आणि करवंटीमुळेच खोबरे जमा झाले होते. आज या


शून्य कचरा : मला लागलेला शोध * १७