उघडले, तर पाकीट पाकीटच राहते. त्याचा आपण पुन्हा उपयोग करू शकतो अथवा अशा पाकिटांचा गठ्ठा जमला, तर तो रद्दीत देऊ शकतो.
थोडक्यात, कागदांची फाडफाडी आणि चोळामोळा करून बोळे करायचे थांबवले, तर कमीतकमी एका डस्टबिनमधील कचरानिर्मिती तरी थांबत होती.
आता माझा उत्साह वाढला. मी स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या बादलीकडे माझा मोर्चा वळविला. त्या बादलीत हात घालता येत नव्हता, कारण बादली उघडताच हाताचा उपयोग नाक दाबायला करावा लागत होता. म्हणून दुसऱ्या दिवशी त्या बादलीत कचरा होण्यापूर्वीच ती तपासायची असे मी ठरवले.
नेहमीप्रमाणे मी दूध घेऊन आलो. कात्री घेतली आणि दुधाच्या पिशवीचा एक कोपरा उडविला. दूध पातेल्यात तापत ठेवले. चहा टाकावा म्हणून चहाचे पातेले घ्यायला बाजूला वळलो. मघाशी कात्रीने उडविलेला दुधाच्या पिशवीचा तुकडा ओट्यावर पडला होता. माझ्याकडे तो केविलवाण्या नजरेने बघतोय, असे मला वाटले. जोपर्यंत तो पिशवीचा भाग होता, तोपर्यंत तो कचरा नव्हता. ज्या क्षणाला मी त्याला पिशवीपासून अलग केले, त्या क्षणाला तो कचरा बनला. म्हणजे माझी पिशवी फाडायची पद्धत चुकीची होती. पिशवी जर मी ब्लेडने आडवी चीर देऊन फाडली असती, तर असा कचरा झाला नसता.
दुधाची पिशवी जर मी बेसिनमध्ये तशीच पडू दिली असती आणि तासा-दोन तासांनी तिला साफ करायला गेलो असतो, तर पिशवी धुताना प्रथम मला थोडीशी तरी किळस वाटली असती. एखाद्या गोष्टीबद्दल किळस वाटणे, हे ती वस्तू कचऱ्यात रूपांतरित होत आहे, याचे द्योतक आहे. मी लगोलग त्या दोन्ही पिशव्या उलट्या करून साबणाने स्वच्छ धुतल्या. फडक्याने पूर्ण पुसल्या. आता त्यांना दूध नासल्याचा आंबूस वास येणार नव्हता. हे सर्व काम दूध तापून चहाला उकळी फुटेपर्यंत झाले होते. किती थोडा वेळ ! नाहीतर या वेळेत मी काय केले असते ? कचरा बनलेल्या त्या पिशवीच्या छोट्या तुकड्याची क्षमा मागून मी पेपर वाचायला बसलो.
आज सुट्टीचा दिवस होता. पेपरमधून हॅण्डबिलांच्या जाहिराती बाहेर पडत होत्या. पूर्वी या कागदांना मी सरळ डस्टबिनची वाट दाखवीत असे, पण आता शून्य कचऱ्याचे गणित मला उलगडू लागले होते. मी त्या सर्व जाहिराती व्यवस्थित गोळा केल्या आणि रद्दीच्या खणात एका बाजूला ठेवून दिल्या.
चहा पीत, पेपर वाचत मी रविवारची सकाळ मजेत घालवीत होतो. ओट्यावर चहाचे पातेले धुवाचये राहिले होते. गाळण्यात चहाची ओली पूड जमा झालेली होती.