पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३. शून्य कचरा : मला लागलेला शोध

 कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ? नागरिकांनीच निर्माण केलेल्या आणि एका न सुटणाऱ्या प्रश्नाशी नगरपालिकेला झुंजावे लागत आहे.
 मोठमोठ्या योजना आखल्या जातात, त्यांवर बरेच पैसे खर्च होतात, पण रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या कचऱ्याच्या कुंड्या मात्र ओसंडून वाहतच असतात.
 कोणत्याही रोगाच्या मुळाशी जाऊन औषधोपचार करावा, असे म्हणतात. म्हणून मी आमच्या घरात रोज भरणाऱ्या कचऱ्याच्या तीन बादल्यांचा अभ्यास कुतूहलाने करू लागलो. त्या बादल्यांमध्ये चक्क डोकावू लागलो आणि हा कचरा मुळात तयार कसा होतो, याचा शोध घेऊ लागलो.
 आमच्याकडे कचऱ्याच्या एकूण तीन बादल्या होत्या. त्यांपैकी एकीत माझ्याकडूनच सर्वात जास्त कचरा जमा होत होता. ती होती मी कामासाठी बसायचो तेथे असलेली डस्टबिन ! मला नको असलेले कागद मी फाडून अथवा बोळा करून त्या डस्टबिनमध्ये टाकत होतो. जोपर्यंत मी ते कागद वापरत होतो, तोपर्यंत ते चागले होते, पण ज्या क्षणाला मी ते कागद फाडायचो अथवा त्याचा बोळा करायचो त्या क्षणाला कचरा तयार व्हायचा. त्या माझ्या डस्टबिनमधील बहुतांशी कचऱ्याचे मूळ हेच तर होते, हीच तर त्याची जन्मवेळ होती. कागद फाडायची अथवा त्याचा बोळा करायची क्रिया मी का करतो ? या प्रश्नाला उत्तर होते ‘उगाचच !' आता कोणी म्हणेल आपली गुपिते दुसऱ्याला कळू नयेत म्हणून कागद फाडणे अत्यंत आवश्यक आहे. अहो पण आपली गुपिते काय प्रत्येक पानावर असतात का ?
 कागद फाडण्याची माझी सवय मी बंद केली, तर हा कचरा निर्माण होणार नव्हता. हे अशक्य आहे असे मला प्रथम वाटले. नंतर मी पणच केला, वापरून झालेल्या अथवा नको असलेल्या कागदाचा चोळामोळा करायचा नाही आणि त्याला फाडायचे तर नाहीच नाही, असे मी ठरविले आणि काय आश्चर्य ! माझी कचरापेटी ओस पडू लागली. नको असलेल्या कागदाचे एका ठरावीक आकाराचे गठ्ठ तयार होऊ लागले, जे मी रद्दीवाल्याला सहज देऊ शकणार होतो, विकू शकणार होतो.
 बारीक कागद, उदाहरणार्थ छोटी-छोटी बिले, दिवसभरात जमा झालेल्या बारक्याबारक्या चिठ्या-चपाट्या हेसुद्धा मी एकत्र गोळा करून ठेवू लागलो.

 माझ्याकडे रोज टपाल येते. त्या टपालात काही पाकिटे असतात. ही पाकिटेसुद्धा टराटर फाडून उघडायची मला सवय होती. जर पाकिटे नीट उघडली, तर त्यांपासून कचरा निर्माण होणार नाही. पाकीट अथवा कोणतेही टपाल वेडेवाकडे उघडले की त्यापासून कचऱ्याची निर्मिती होते. ते व्यवस्थित, थोडासा विचार करून शांतपणे


शून्य कचरा : मला लागलेला शोध * १५