पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढे त्यांच्यावर योग्य संस्कार न केल्याने किंवा त्यांचे योग्य व्यवस्थापन न केल्याने त्यांना किळसवाणे रूप येते. या ‘वाव'च्या माथी हे किळसवाणं रूप यायला सर्वस्वी आपण, म्हणजेच त्यांना वापरणारा, जबाबदार आहे.
 एखादी गोष्ट वापरून झाली की जराही विचार न करता ती टाकून द्यायची सवय आपल्या अंगी इतकी मुरली आहे की, असं करताना आपण काही गैर करत आहोत हे आपल्या लक्षातदेखील येत नाही.
 या सवयीवर जरा विचार करायला पाहिजे. वापरून झालेल्या गोष्टी टाकून द्यायच्या या सवयीच्या अतिरेकाचे उदाहरण म्हणजे आजकालचे आजी-आजोबा आहेत. वापरून झाले ! आता यांचे काय करायचे ! वाऱ्यावर सोडून देता येत नाहीत, मग करा दुर्लक्ष त्यांच्याकडे. वापरून झालेल्या वस्तू टाकून द्यायची सवय लागलेल्या मुलांनी सोडून दिलेल्या ह्या आईवडिलांकडे बघितले की वाटते, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आपण मुलांना वेळीच शिकवले नाही त्याचीच तर ही फळे नाहीत ना.
 ‘कैझन, सिक्स सिग्मा, झिरो डिफेक्ट, ISO9000, जस्ट ईन टाइम' ही नाव आपण आजकाल बऱ्याच वेळा ऐकतो. कसली आहेत ही नावे ? एका विशिष्ट तऱ्हेने वागायच्या, विचार करायच्या ह्या वेगवेगळ्या प्रणाल्या आहेत. ISO9000, ची मूळ संकल्पना तर आपल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचीच आहे. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. याचा खरा अर्थ परदेशी लोकांना समजला. त्यांनी त्याला ISO9000, च्या ढाच्यात बसवलं आणि तो ढाचा आपल्यालाच विकला.
 उद्या कदाचित MOUA (मौ) म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ यूजडू आर्टिकलस्' अशी एखादी प्रणालीही आपल्याकडे विकायला येईल !
 मग मोठमोठ्या सोसायट्या मोठ्या अभिमानाने, खूप पैसे खर्च करून आपल्या फाटकावर पाटी लावतील, ‘आमची सोसायटी ‘मौ' आहे !'
 तेव्हा कोणीतरी जपानहून किंवा अमेरिकेहून आयात करून आपल्याला ही 'मौ' प्रणाली विकण्यापेक्षा, आपणच का नाही 'वाव' प्रणाली बनवून जगाला विकावी ? वापरलेल्या वस्तूचे व्यवस्थापन करण्यासाठी काय करायला पाहिजे? हा पहिला प्रश्न आपणा सर्वांच्या मनात येईल. त्याचं उत्तर असं -
 ‘प्रथम तुम्हांला मनापासून वाटले पाहिजे की, या वापरून झालेल्या वस्तूचे मी योग्य व्यवस्थापन करणार आहे. तसे मी मनापासून ठरवले आहे. आणि ते माझे कर्तव्य आहे असे मी मानतो.'

 यासाठी पहिली क्रिया कोणती करायला पाहिजे ? ती म्हणजे तुम्ही जाहीर करायला पाहिजे की, माझ्या घरात वापरून झालेल्या गोष्टी आजपासून मी घराबाहेर टाकणार नाही.


‘वाव' वापरलेल्या वस्तू * ११