Jump to content

पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२.'वाव'( वापरलेल्या स्तू)

शून्य कचरा - म्हणजेच पराकोटीची स्वच्छता किंवा वापरून झालेल्या गोष्टींचे, वस्तूंचे योग्य व्यवस्थापन होय.
 ‘शून्य कचरा' असे म्हणण्याऐवजी पराकोटीची स्वच्छता' असे म्हटले तर ? लोकांच्या लक्षातच येणार नाही. कारण आपल्याकडे स्वच्छतेबद्दल आस्थाच नाही.
 ‘शून्य कचरा' म्हटले की कसे लोकांच्या लगेच लक्षात येते. याला कारण आहे. स्वच्छतेपेक्षा कचराच आपल्या जास्त परिचयाचा आहे.
 साधारणपणे इयत्ता चौथीपर्यंत शाळेत मुलांना स्वच्छतेचे धडे दिले जातात. चौथीनंतर मुलांना आणि स्वच्छतेला खऱ्या अर्थाने वाऱ्यावर सोडलेले असते. आज आपल्याकडील बहुतांश शाळांमधील वर्गात उभे राहून वर नजर केली की जळमटे हमखास दिसतात.
 कचरा तयार होण्याचे मूळ खरे तर इथे रुजलेले आहे. या वयात जर आपण मुलांच्या अंगी स्वच्छतेचे बाळकडू पाजले, तर त्यांना खऱ्या अर्थाने कचऱ्याचा अर्थ समजेल. सर्वप्रथम आपण कचरा हा शब्द बदलू या. कारण कचरा म्हणजे घाण,गलिच्छपणा हे आपल्या डोक्यात बसले आहे.
 जुनी गाडी म्हणायच्या ऐवजी आजकाल आपण ‘प्रिओनड कार' असं म्हणतो. बाळ्या किंवा बाळू म्हणायच्या ऐवजी बाळराजे, किंवा बन्याऐवजी बबनराव म्हटलं की जसा त्याच व्यक्तीला भारदस्तपणा येतो, तसच कचरा हा शब्द बदलून वाव (वापरलेल्या वस्तू) असं म्हटलं तर कसं वाटेल ! नावाची झूल बदलल्यावर आतल्या वस्तूलाही आपोआप हळूहळू बदलावे लागेल. जशा प्रिओन्ड गाड्या चकाचकच असतात, तशाच वापरून झालेल्या गोष्टीसुद्धा स्वच्छ अन् व्यवस्थितच ठेवायची सवय आपल्याला लागेल.

 एखादी गोष्ट वापरून झाली की ती आपल्याला नकोशी होते. ती आपण जोपर्यंत वापरत असतो, तोपर्यंत आपल्याला तिची घाण, किळस वाटत नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर, बटाट्याच्या सालीच घ्या, केळ्याची साल बघा किंवा बाजारातून पावभाजी ज्या पिशवीतून येते, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडे जरा नजर टाका. जोपर्यंत बटाटा, केळे, पावभाजी यांना आपल्याला सांभाळायचे किंवा कोठेतरी घेऊन जायचे आहे, तोपर्यंत त्यांच्या साली अन् पिशव्या आपल्याला हव्या असतात. ज्या क्षणाला साली अन् पिशव्या, बटाटा, केळी आणि पावभाजी यांपासून सुट्या होतात, त्या क्षणाला त्यांच्या नशिबी कचरेपण येते किंवा या गोष्टी ‘वाव' बनतात.


१० * शून्य कचरा