रद्दीवाल्याकडे एक वाहन येतं, आणि सर्व काचा घेऊन जातं. अशा रितीने काचेचा कचरा शून्य झाला. आपलं काम आहे, गावातील असा रद्दीवाला शोधायचा जो सर्व प्रकारच्या काचा घेतो आणि काचा त्याच्यापर्यंत पोचवायच्या.
४) जाड प्लॅस्टिक : प्लॅस्टिकशिवाय आपण जगूच शकत नाही. आपल्या घरात अनंत प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू येत असतात. वापरून झाल्या की त्या आपण सहज टाकून देतो. पण आता आपल्या घरात त्या टाकण्यासाठी कचऱ्याची बादलीच नाही. मग या वापरून झालेल्या, मोडलेल्या, नको असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू कुठेतरी ठेवायला हव्यात, त्यासाठी एक साधा उपाय आहे. घरात एक मोठी पिशवी अडकवून ठेवा आणि त्या पिशवीत टाकण्यासाठी तयार झालेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवायला सुरुवात करा. हळूहळू ही पिशवी भरेल. भरली की ती पिशवी रद्दीवाला किंवा भंगारवाल्याला द्या. अशा वस्तूंचे पैसे तो नक्की देतो. या सर्व वस्तू रीमोल्डींगसाठी वापरल्या जातात. पैसे मिळाले आणि सर्व जाड प्लॅस्टिक योग्य ठिकाणी पोहोचले. जाड प्लॅस्टिकचा कचरा शून्य झाला.
५) चिनी मातीची भांडी : ह्या प्रकारात बहुतकरून कप-बश्या, फरश्या (टाईल्स), मग, बरण्या ही मंडळी येतात. काचेप्रमाणे या गोष्टी फुटतात. त्यांच्या नावातच या प्रकारच्या वस्तूंचे व्यवस्थापन कसे करायचे हे लगेच लक्षात येईल. या सर्व वस्तू म्हणजे तापवलेली माती. सध्या अनेक इमारती तयार होत आहेत. त्यांना भरावासाठी दगड-माती असे पदार्थ लागतातच. फुटलेल्या कपबशीला ह्या दगड-मातीच्या ढिगाऱ्यापर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे. ज्या कपबशीनं तुम्हांला चहा पाजला तिला तिच्या माहेरी पोहचवले तर त्यांचा कचरा होणार नाही.
६) नारळाच्या करवंट्या : ह्या जरी जैविक असल्या तरी त्यांच्या विघटनाला बराच कालावधी लागतो. या इंधन म्हणून म्हणजेच जाळण्यासाठी वापरणे अति उत्तम. अजूनही आपल्या नशिबानं या करवंट्या जाळून पाणी तापवणारी माणसं आपल्या आजूबाजूला राहत आहेत. त्यांना या करवंट्या द्याव्यात.
७) हाडं : सामीष आहारात हाडांचा कचरा तयार होतो. लहान हाडं ही अविरतपात्रात खतात रूपांतरीत होतील. मोठी हाडं म्हणजे कॅल्शियम म्हणजे दगड. या हाडांना चिनीमातीच्या भांड्याप्रमाणेच दगड-मातीच्या ढिगा-यात टाकावे.
८) पातळ प्लॅस्टिक : पातळ प्लॅस्टिक हा खरंतर फार भयावह आणि कोणाकडेच उत्तर नसलेला असा प्रकार आहे. हे पातळ प्लॅस्टिक तयारच करू नये असं म्हणणं जरी बारोबर असलं, तरी ते शक्य नाही. काही मंडळींनी या प्लॅस्टिकपासून तेल निर्मितीचे प्रयोग केले आहेत. पण अजून तरी ते पूर्णपणे व्यापारी तत्त्वावर यशस्वी झालेले नाहीत.