पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थोरात-पाटील, शंकर पांडुरंग संरक्षण खंड त्यांच्या या अहवालाचा परिणाम त्यांना सरसेनापतीपद न मिळण्यात झाला. ते १९६१मध्ये प्रदीर्घ सैनिकी सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर काही महिन्यांतच चीनने भारतावर हल्ला केला. चीनच्या या अनपेक्षित कृतीमुळे भारतातील तमाम नेत्यांना धक्का बसला. त्या वेळी थोरात यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालाची सर्वांना प्रकर्षाने आठवण झाली. त्यांच्या त्या अहवालातील भाकितानुसारच चीनने नेफातून हल्ला केला होता. त्यांच्या अहवालाचा जर स्वीकार केला गेला असता, तर कदाचित भारतावरील नामुष्की टाळता आली असती. लष्करातील त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना ‘कीर्तिचक्र’, तसेच ‘पद्मश्री’ सन्मान देऊन गौरविले. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर, १९६१मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली. या पदावरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. १९६२मध्ये त्यांनी कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली. त्यांनी आपल्या सैनिकी जीवनाचे आत्मचरित्र, ‘रिव्हेली टू रिट्रीट’ या नावाने लिहिले आहे. - धनंजय बिजले संदर्भ : १. ‘अथश्री’ नियतकालिक, मे २०१०.

  • * *

४४४ शिल्पकार चरित्रकोश