पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

की शिक्षणतज्ज्ञात कराय डॉ. जयंत नारळीकर यांच्यावरची नोंद खगोलशास्त्रज्ञात करायची की विज्ञान साहित्यिकात? प्रा. श्रीराम अभ्यंकरांची नोंद गणितज्ञात करायची की शिक्षणतज्ज्ञात करायची? प्रा. गो. रा. परांजपे यांची नोंद विज्ञान प्रसारकात करायची की शिक्षणतज्ज्ञात करायची? डॉ. व.रा. खानोलकराची नोंद डॉक्टरांच्यात करायची की संशोधकात करायची? प्रा. श्री. अ. दाभोलकरांची नोंद शेती तज्ज्ञात करायची की शिक्षणज्ज्ञात करायची? शंतनुराव किर्लोस्कर आणि वालचंद हिराचंद यांची नोंद आघाडीचे तंत्रज्ञान शोधून काढणाऱ्यात करायची की उद्योगपती म्हणून भागवून न्यायचे? मग यातून एक असा तोडगा काढला की ज्याचे ज्या क्षेत्रात अधिक काम असेल त्याची विस्तृत नोंद त्या विषयाच्या कोशात द्यावी आणि तुलनेने दुय्यम कामगिरी असलेल्या दुसऱ्या क्षेत्राची माहिती इतर विषयाच्या खंडात द्यावी. ___ या शिल्पकार चरित्रकोशमालेतील विज्ञान व तंत्रज्ञान कोशासाठी मराठी विज्ञान परिषदेसारखी संस्था मिळाल्याने सर्वच कामे फार सुकर झाली. कारण चरित्रनायकांचा व लेखकांचा एक डेटा बेस परिषदेकडे कायमचा उपलब्ध असतो आणि अशा सर्व प्रकारच्या लोकांची उठबस परिषदेत नित्यनेमाने चालू असते. एखादा प्रकल्प आल्यावर त्याची जुळणी करत बसायला लागत नाही. त्यामुळे १६३ चरित्र लिहून घेण्यासाठी पन्नासेक लेखकांची फौज मराठी विज्ञान परिषद सहजपणे उभी करू शकली. हे लेखकही केवळ मुंबईतले नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेले असे आहेत, त्याची प्रचिती आपल्याला या खंडाच्या शेवटी दिलेल्या लेखकांच्या सूचीवरून येईल. इतक्या लेखकांकडून त्यांच्या शैलीत परंतु एका विशिष्ट पद्धतीने लेख लिहवन घेणे हा एक मोठा वाद्यमेळाच असतो आणि त्यातून सुमधुर संगीताची निर्मिती करणे किती अवघड असते हे एक झुबिन मेहताच जाणू शकतात. आम्ही त्यात किती यशस्वी झालो आहोत हे आपण वाचकच ठरवू शकणार. या कोशाच्या लिखाणाचे काम अत्यंत चटकन झाले. परंतु या कोशाची सांगड अन्य विषयाबरोबर घातली गेली असल्यामुळे तो वाचकांपर्यंत पोहोचण्यात अंमळ उशीरच झाला आहे. ___ या खंडाच्या लेखकांना संदर्भ म्हणून मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रदीप म्हात्रे यांनी न कंटाळता, अक्षरश: अनेकवेळा अनेक ठिकाणाहून माहिती मिळवून ती उपलब्ध करुन दिली आहे. चरित्रनायकांची छायाचित्रे मिळवणे, विशेषत: जे काळाच्या पडद्याआड जाऊन बरीच वर्षे लोटली अथवा जे निधन पावून फारसा काळ लोटला नाही अशांच्या नातेवाईकांचे पत्ते मिळाले नाहीत ही कसरतही प्रदीप म्हात्रे आणि अजय दिवेकर यांनी सांभाळली. बऱ्याच चरित्रनायकांच्या जन्म आणि मृत्यू तारखा मिळवणेही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठीही खास शोध पथके पाठवावी लागली. प्रसंगी चित्रगुप्तालाही इ-मेल करावे लागले. सर्व लेखांचे डीटीपी श्रीमती आशा शिराळ यांनी केले. सर्व चरित्रांचे मुद्रणशोधन मिलिंद वेलिंगकर यांनी दोन दोन-तीन तीन वेळा न कंटाळता केले असून त्यात क्वचितच मुद्रणदोष राहिले असतील. तरीही शंभर टक्के मुद्रणदोषविरहीत एकादे प्रकाशन असणे ही तर आम्हाला वाटते कल्पनातीत गोष्ट असावी. त्या दृष्टीने क्वचित काही मुद्रणदोष मिळाले तर तो अपघात समजावा. शेवटी, विवेक साप्ताहिकाने मोठया विश्वासाने हे काम मराठी विज्ञान परिषदेकडे सोपवले त्यास आम्ही किती पात्र ठरलो हे वाचकांनीच ठरवावे. - बाळ फोंडके / अ.पां.देशपांडे ८ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश