पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकीय हीरक महोत्सवी साप्ताहिक विवेकने हाती घेतलेल्या 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण – शिल्पकार चरित्रकोश' या प्रकल्पातील या खंडांच्या मालिकेतील तिसरे पुष्प हा 'विज्ञान व तंत्रज्ञान खंड आणि शिक्षण खंड' हे एकत्रितपणे प्रकाशित होत आहे. यातील विज्ञान व तंत्रज्ञान खंडाची संपादकीय जबाबदारी मराठी विज्ञान परिषदेने घ्यावी असे चरित्रकोश प्रकल्पाच्या प्रकल्प समितीच्या मनात होते. त्याला अनुसरून २००६ मध्ये साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आणि तत्कालीन प्रकल्प समन्वयक मकरंद मुळे यांनी मराठी विज्ञान परिषदेत येऊन आमची भेट घेतली व या खंडाविषयी सविस्तर चर्चा केली. आम्ही दोघांनी मिळून या खंडाचे संपादन करावे असा प्रस्ताव तेव्हा मांडला. त्याला आम्ही सहर्ष होकार दिला. साधारणतः इ.स.१८०० पासून ते २००० पर्यंतच्या काळात ज्यांनी महाराष्ट्र घडविला अशा वैज्ञानिक व तंत्रज्ञांची चरित्रे या खंडात द्यायची असे ठरले. याच बैठकीत मराठी विज्ञान परिषदेने तयार करून ठेवलेली संभाव्य चरित्रनायकांची सूची त्यांच्यासमोर मांडण्यात आली. या सूचीत एकूण १२१ चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला होता. पण खंडाचे काम पुढे सरकत गेले तसतशी यात भर पडत ही सूची १६३ पर्यंत जाऊन पोहोचली. ___ एक गोष्ट मात्र खरी की, महाराष्ट्राला जेवढी राजकारणी लोकांची, गायकांची, समाजसुधारकांची, नट आणि नाटककारांची, साहित्यिकांची आणि खेळाडूंची परंपरा लाभली आहे तेवढी काही वैज्ञानिकांची आणि तंत्रज्ञांची परंपरा लाभली नाही. अन्यथा २०० वर्षांच्या दीर्घ कालावधीचा आढावा घेताना ही चरित्रनायकांची सूची किमान ५०० पर्यंत तरी जायला हवी होती. या सूचीत महाराष्ट्राच्या सर्व भागांतील मान्यवरांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही नावे अनवधानाने राहून गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे झाले असल्यास त्यासाठी अगोदरच आम्ही उभयता क्षमा मागत आहोत. कारण तसे मुद्दाम करण्याचा आमचा कोणाचा यत्किंचितही हेतू नव्हता. चरित्रनायक सूची तयार करताना केवळ मराठी मातृभाषा असणारे तेच महाराष्ट्रीय असा निकष न ठेवता जे जे महाराष्ट्रात जन्मले, मग ते अन्य भाषा बोलणारे असले तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र असल्यामुळे त्यांचाही यात अंतर्भाव केला आहे. उदाहरणार्थ अणु संशोधनाचे साम्राज्य उभे करणारे डॉ. होमी भाभा आणि कारखानदारीचा पाया घालणारे जमशेदजी टाटा. जे इतरत्र जन्मले पण पुढे महाराष्ट्रात यऊन ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र घडवला त्यांचाही यात अंतर्भाव केला आहे. उदाहरणार्थ कोकण रेल्वे साकार करणारे इ.श्रीधरन आणि बी. राजाराम. जे महाराष्ट्रातून परदेशात गेले आणि ज्यांनी तेथे झेंडे लावले असे राजेंद्र शेंडे, जयंत साठे इत्यादींचाही यात समावेश आहे. काही व्यक्ती या बहुपेडी असतात. त्यांचे वर्गीकरण शिल्पकार कोशात कसे करायचे ही समस्या पहिल्या दिवसापासून उद्भवली होती. उदाहरणार्थ बाळशास्त्री जांभेकरांची नोंद पत्रकार म्हणून करायची की गणिती म्हणून की शिक्षणतज्ज्ञ म्हणून? मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते गणित शिकवत आणि त्यांचे विभाग प्रमुख आजारी पडून इंग्लंडला परत गेल्यावर त्यांच्या जागी या २५ वर्षाच्या तरुण माणसाला विभाग प्रमुख म्हणून नेमले गेले होते. शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / ७