पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भूमिका 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण-शिल्पकार चरित्रकोश' या प्रकल्पाचा तिसरा खंड वाचकांच्या हाती देत असताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीपासून भविष्यकालीन महाराष्ट्राचा वेध घेण्यापर्यंत या प्रकल्पाची व्याप्ती आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान व भविष्य या संबंधीची एक व्यापक जाणीव या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाचकापुढे ठेवत आहोत. विज्ञानाच्या बळावर छोट्या-छोट्या युरोपीय देशांनी आपल्या आकारमानाच्या व लोकसंख्येच्या अनेक पट असलेल्या आशिया, अमेरिका व अन्य खंडांतील देशांवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्यामुळे आपला देश व समाज समर्थ व्हावयाचा असेल तर त्याकरिता मूलभूत संशोधन करणाऱ्या व त्याचे व्यावहारिक उपयोजन करणाऱ्या वैज्ञानिकांची, तंत्रज्ञांची व नवतंत्रज्ञानाधिष्ठित उद्योग उभ्या करणाऱ्या उद्योजकांची गरज असते. या खंडाच्या रूपाने अशा वैज्ञानिकांची व तंत्रज्ञांची परंपरा वाचकांसमोर ठेवण्याचे काम आम्ही मराठी विज्ञान परिषदेवर सोपविले आणि त्यांनी ते दिलेल्या काळात अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडले. याबद्दल आम्ही मराठी विज्ञान परिषदेचे आणि डॉ. बाळ फोंडके व डॉ. अ. पां. देशपांडे या संपादकद्वयांचे मनःपूर्वक आभार मानतो. आधुनिक शिक्षणाची जाणीव हा प्रबोधन काळातील महत्त्वाचा टप्पा होता. इंग्रजी राजवटीचे आव्हान पुढे आल्यानंतर पुढील प्रगतीसाठी नव्या शिक्षण पध्दतीचा स्वीकार केला पाहिजे याची जाणीव समाजधुरिणांना होऊ लागली. जात, वर्ण व लिंग यांचा विचार न करता सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार आहे ही भूमिका व धर्मशास्त्राधारित शिक्षणपध्दतीऐवजी इहवादी शिक्षणपध्दती ही नव्या शिक्षणपध्दतीची वैशिष्टये होती. समाजाच्या ऐहिक व मानसिक प्रगतीसाठी व आधुनिक जीवनमूल्यांवर समाजनिर्मिती करण्यासाठी आधुनिक शिक्षण हा रामबाण उपाय आहे हे समाजधुरिणांना पटले होते. या शिक्षणातून राष्ट्रीय अस्मिता जागृत होत नाही म्हणून या शिक्षणाच्या जोडीला राष्ट्रीय अस्मितेचे शिक्षण देण्याचेही प्रयोग झाले. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्वकाळात शिक्षणप्रसार हे समाजसेवेचे प्रमुख माध्यम बनले. स्वातंत्र्योत्तरकाळात नवराष्ट्र उभारणीचे आव्हान देशापुढे उभे होते. स्वाभाविकच नवराष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उभे करणे हे शिक्षणाचे प्रमुख अंग बनले. त्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्यात आले. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत व्यावसायिक तत्त्वावर चालणाऱ्या शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या आहेत. या सर्व स्थित्यंतराचा आलेख शिक्षण खंडातील विविध शिल्पकारांच्या चरित्रांतून वाचकांसमोर उभा राहणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित करण्याचे काम अत्यंत जिकिरीचे, कष्टाचे व चिकाटीचे होते. या खंडाच्या संपादक मंडळाने ते यशस्वीरित्या पार पाडले आहे. याबद्दल त्यांचेही आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्वयंप्रेरणेने किंवा आमच्या विनंतीला मान देऊन विविध विषयांतील तज्ज्ञ, पुरस्कर्ते व ग्राहक यांचे सहकार्य लाभले आहे, लाभत आहे; त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अशा प्रकारचा प्रकल्प भरीव अर्थसाहाय्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या साहाय्यासाठी प्रमुखतः निर्माण ग्रूप ऑफ कंपनीज, दि सारस्वत को-ऑप. बँक व कीर्तने - पंडित इन्फार्मेशन टेक्नॉलोजी यांनी तसेच अन्य प्रायोजकांनी सहकार्य दिले. त्यामुळे हा प्रकल्प थोडा अधिक काळ घेऊन का होईना, पण निश्चितपणे पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. - दिलीप करंबेळकर शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / ३