पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधारावर त्या काळी विमानविद्येनं या देशात चांगलंच बाळसं धरलं होतं असा दावा केला जातो. तो खरा मानायचा तर गुरुत्वाकर्षणाच्या बलाची ओळख त्या काळात पटली होती, त्याचं स्वरूप अवगत झालं होतं आणि त्याचे नियम, सूत्र यांचाही परिचय झाला होता असं मानायला हवं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर मात करत आकाशगामी कसं व्हायचं हेही अवगत होतं, त्यासाठी आवश्यक क्षमता असणाऱ्या इंजिनाची बांधणी कशी करायची याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं असायला हवं, असं विमान चालवण्याचं शिक्षण देणाऱ्या विद्यालयांची स्थापना झालेली असायला हवी, त्या विमानाचा सांगाडा बांधण्यासाठी योग्य ते गुणधर्म असणाऱ्या धातूची निर्मिती करण्याचं ज्ञान आणि त्याचं उत्पादन करणारे कारखाने स्थापित झालेले असावयास हवेत. या विमानांच्या उड्डाणासाठी विमानतळ बांधलेले असावयास हवेत, आकाशातल्या त्याच्या उड्डाणाचं नियंत्रण करणारे कक्ष हवेत. हे सारं तंत्रज्ञान विकसित झालेलं असेल तरच विमानविद्या अवगत होती असं अनुमान काढता येतं. तसं करण्यास मदत करणारी कागदपत्रं वा इतर विश्वासार्ह पुरावे सापडलेले नाहीत. तीच बाब महाभारतात असलेल्या वायव्यास्त्र किंवा अग्न्यस्त्र वगैरेंची. त्यामुळं आज आधुनिक युगात उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान त्या काळात विकसित झालं होतं किंवा त्यासाठी आधारभूत असणारी विज्ञानसूत्र अवगत झालेली होती असं मानण्यास जागा नाही. पण याचा अर्थ त्या काळात काहीच प्रगती झालेली नव्हती किंवा ज्ञानसंग्रहाचं दालन रिकामं होतं असंही म्हणण्याचं कारण नाही. आयुर्वेद ही आरोग्यप्रणाली त्या काळात संपूर्ण विकसित झाली होती. ती त्याच काळातील सर्वात प्रगत प्रणाली होती. एवढंच नाही, तर त्यातील अनेक सूत्र आजही तितकीच लागू पडतात हे सिद्ध करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आयुर्वेद ज्यांना प्रमाण मानतं असे ते ग्रंथ म्हणजे चरकसंहिता (इसवी सनाचे पहिले शतक), सुश्रूतसंहिता (इसवी सनाचे दुसरे शतक) आणि वाग्भट (इसवी सनाचे सातवे शतक) हे होत आणि तेव्हापासून आजवर आयुर्वेदाची एक अखंड परंपरा आपल्याला दाखवता येते. जागतिक प्रदूषण आणि आधुनिक अॅलोपथिक औषधांच्या जाणवणाऱ्या दुष्परिणामांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करू लागतो, तेव्हा जगभर परत एकदा लोक आयुर्वेदाच्या मागे का लागले आहेत ते लक्षात येते. मात्र, आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाची जोड देज औषधात प्रमाणीकरण आणणे, औषधांच्या सर्व बाटल्यांवर औषधात असलेले घटक दाखविणे आणि औषधे बनविणाऱ्या कारखान्यात गुणवत्ता नियंत्रण करणे ह्या गोष्टी कराव्या लागतील. आयुर्वेदाची मूलभूत तात्त्विक बैठक पाश्चात्त्य वैद्यक प्रणालीच्या म्हणजेच अॅलोपथीच्या तात्त्विक बैठकीपेक्षा कशी वेगळी आहे हे सप्रमाण सिद्ध करावं लागेल. त्यामुळं आयुर्वेदातील निदान आणि उपचार या दोन्हींचीही परीक्षा करण्यासाठीचे निकष व पद्धती वेगळी का असावी हे तर्कसंगतरीत्या जगापुढं मांडावं लागेल आणि त्याच्या समीक्षेचे रूपबंधही आधुनिक विज्ञानपद्धतीशी सुसंगत रीतीनं विकसित करावे लागतील. __ आयुर्वेदातील श्लोकांचा आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अर्थ लावून तो कसा सुसंगत आहे हे दर्शवणारं संशोधन आज होत आहे. चरकसंहितेतील सूत्रानुसार बनवलेली औषधं आजही काही व्याधींवर सर्वात गुणकारी सिद्ध होत आहेत. त्यांचं औद्योगिक स्तरावर उत्पादन होत आहे आणि जगभर त्यांचं वितरणही होत आहे. सुश्रूतानं शस्त्रक्रियेसाठी वापरलेली उपकरणं सापडलेली आहेत. आजचे शल्यविशारद वापरत असलेल्या उपकरणांपेक्षा ती फारशी वेगळी नाहीत. दिल्लीचा पाचव्या-सहाव्या शतकातला लोहस्तंभ त्या काळातल्या विकसित धातुविज्ञानाची साक्ष देत उभा आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिर त्या काळातल्या प्रगत वास्तुशिल्पाची ग्वाही देत आहे. भास्कराचार्य, लीलावती यांचे ग्रंथ गणितातील प्रगतीचे साक्षीदार आहेत. हे विज्ञान निश्चितच विकसित झालं होतं आणि ते करण्यात ज्यांनी कळीचं योगदान दिलं, त्यांचा समावेश शिल्पकारांमध्ये करण्यास प्रत्यवाय नसावा. खगोल विज्ञानातही आपल्या वैज्ञानिकांनी गरुडझेप घेतली होती हे पटवून देणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. वराहमिहिर, शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / २३