पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चक्रानुसार आपल्या परिसरातही बदल होत असतात आणि त्यांचंही एक आवर्तन होतं. या दोन आवर्तनांची परस्परात सांगड आहे हा अनुभव सर्वानीच घेतला होता. त्यातलंच मग एक कार्य आणि दुसरं कारण असं अनुमान काढणं तर्कसंगत वाटत होतं. अशा अनुभवांचीही मानवाच्या ज्ञानसंग्रहात भर पडत गेली. ही भर घालण्याचं मौलिक कार्य करणारे महाभाग त्या कालखंडातले विज्ञानाचे बिनीचे शिलेदार होते. शिल्पकार होते. त्यांनी हा ज्ञानसंग्रह स्वत:पुरताच सीमित न ठेवता, त्याचा प्रसार करण्याचं कामही केलं होतं. त्यातूनच गुरुकुल परंपरा निर्माण झाली होती. काहींना त्या काळचा राजाश्रयही मिळाला होता. तरीही हा प्रसार मुख्यत्वे मौखिक पद्धतीनं होत असल्यामुळं त्याची व्याप्ती मर्यादित राहिली होती. भूर्जपत्रांवरील प्राथमिक स्वरूपाच्या लेखनातून यांपैकी काहींना अक्षरस्थान प्राप्त झालं होतं. त्यांतील जे काही टिकून राहिलं आहे, ते आज हस्तगत करण्यात यश मिळालं आहे. त्याच्या अध्ययनातून त्या काळच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाचा परिचय होऊ शकतो. ही परिस्थिती साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या पाच-सहा शतकांपर्यंत राहिली. पण, तिची गती मंदावत असल्याची चिन्हंही दिसत होती. ज्ञानलालसेच्या प्रेरणेला दुय्यम-तिय्यम स्थान प्राप्त झालं होतं. मानवप्राण्याच्या इतर ध्यासांना अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. निसर्गाची सर्वच गूढ उकलल्यामुळं ही परिस्थिती समोर उभी राहिली होती किंवा नवनवीन अनुभव येणं थांबलं होतं अशातला भाग नव्हता, पण तत्त्वचिंतनासाठी लागणारं वातावरण लुप्त होत चाललं होतं हे मात्र मागं वळून पाहता स्पष्ट होतं. त्यानंतर जणू ज्ञानप्रकाश एकाएकी लुप्तच झाला. एका अंधकारमय कालखंडात मानवप्राणी चाचपडत राहिला. ज्ञानसंग्रह नष्ट झाला नाही, पण त्यात मोलाची भरही पडली नाही की त्याला खास महत्त्वही दिलं गेलं नाही. मानवी सर्जनशील प्रेरणेलाच जणू ग्रहण लागलं. या ज्ञानापाय 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वाचा प्रसार होण्याऐवजी मानवातील प्राणी जातीची वैशिष्ट्यं उफाळून वर आली. प्रादेशिक स्वामित्वाला महत्त्व प्राप्त झालं. ते प्रस्थापित करण्याच्या नादात मानवजातीचं विविध कळपांमध्ये गठन झालं. या कळपांच्या, खरं तर टोळ्यांच्या आपापसातील युद्धांना प्रारंभ झाला. त्याला धार्मिक वरिष्ठतेच्या भूमिकेचं प्रोत्साहन मिळालं. त्यापायी मानवजातीच्या पुढच्या काही शतकांचा इतिहास अशा प्रकारच्या संघर्षांनीच भारलेला राहिलेला आहे. संस्कृती संवर्धनाच्या प्रवाहाला अटकाव होत राहिला. जगाच्या जवळजवळ सर्वच भागांत ही परिस्थिती होती. त्यात बदल झाला तो मुख्यत्वे युरोपात चौदाव्या-पंधराव्या शतकात सुरू झालेल्या सर्जनशील नवनिर्मितीच्या पुनरुत्थानातून, रेनेसान्समधून. कला, साहित्य, विज्ञान या मानवाच्या सर्जनशीलतेची प्रचीती देणाऱ्या सर्वच क्षेत्रांनी काजळी झटकून टाकली. एका नव्या क्रांतीचं वारं सर्वत्र वाहू लागलं. विज्ञानाच्या विकासातील दुसऱ्या कालखंडाचा प्रारंभ झाला. या कालखंडात एक महत्त्वाचा बदल झाला. तत्त्वचिंतन आणि अनुभवजन्य अनुमान या दोन आधारस्तंभांना प्रायोगिक परीक्षेची जोड मिळाली आणि या नव्या पद्धतीनंच पाहतापाहता अग्रस्थान मिळवलं. अनुभव येण्याची वाट न पाहता, वास्तव परिस्थितीत नियंत्रित बदल करून त्याच्या परिणामांचा अनुभव घेत त्यांची परीक्षा करण्याचं आणि त्यातून मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारावर मूलतत्त्व शोधून काढण्याची नवीन पद्धत विकसित होत गेली. नियंत्रित बदल करण्याचा प्रयोग व्यक्तिनिष्ठ नसे, तो वस्तुनिष्ठ असे, तो करण्याची मुभा आणि क्षमता कोणाकडेही असे. यामुळंच या पद्धतीला सर्वमान्यता मिळत गेली. त्यामुळंही असेल कदाचित, जी विज्ञानाची घोडदौड सुरू झाली, ती आजतागायत राहिली आहे. ___ आपल्या देशातील विज्ञान अध्ययनाचेही असेच दोन कालखंड पडतात. प्राचीन काळात देशात विज्ञानाचा विकास झाला होता, परंतु वेदकाळातही आपल्या देशात आजच्या अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा सर्वदूर प्रसार झाला होता या दाव्याची पुष्टी करणारे विश्वासार्ह पुरावे आढळत नाहीत. रामायणात 'पुष्पक' विमानाचा उल्लेख आहे. त्या २२ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश