पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवश्यक ठरतं. त्याचबरोबर, एकंदरीत विज्ञानाची वाटचाल, महाराष्ट्रात, देशात आणि जागतिक स्तरावरही, कशी झाली याचाही विचार करणं आवश्यक ठरतं. विज्ञानाच्या इतिहासाचे दोन मुख्य कालखंड आहेत. आपल्या अवतीभोवती पसरलेल्या निसर्गाच्या अनेक आविष्कारांचं गूढ मानवाला सतावत आलं आहे. धरतीवर वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्यालाच त्याचं कुतूहल वाटत असतं. किमानपक्षी, अशा आविष्कारांपासून आपल्याला धोका नाही याची खातरजमा करून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटत असते आणि ती पटली नाही तर जेव्हा-जेव्हा असे आविष्कार होतात, तेव्हा-तेव्हा स्वसंरक्षणासाठी योग्य तो पवित्रा घेण्याची उपजत ऊर्मी प्रत्येक सजीवाच्या अंगी असते. पण, या आविष्काराचं गूढ उकलण्याची बौद्धिक क्षमता मात्र केवळ मानवप्राण्याच्याच ठायी आहे. एवढंच नाही, तर एकदा का त्या सतावणाऱ्या कोड्याची उकल झाली की त्यापाठील मूलभूत सूत्राचा वापर स्वत:च्या विधायक भल्यासाठी आणि प्रसंगी विघातक बुऱ्यासाठीही, करण्याची प्रेरणा मानवप्राणी बाळगून आहे. या दिशेनं केलेल्या प्रयासालाच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी नामाभिधानं प्राप्त झाली आहेत. ___ या गूढांविषयीचं चिंतन करून त्यांच्याविषयीची एक सैद्धान्तिक भूमिका मांडण्याचे प्रयत्न प्राचीन काळी झाले. त्या काळात, जगाच्या पाठीवर, निरनिराळ्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या संस्कृती उदयाला आल्या, त्या सर्वामध्येच अशा प्रकारचं तत्त्वचिंतन केल्याचं आढळतं. कोहं, कुतो आयात:, या दोन प्रश्नांनी प्रामुख्यानं मानवाला या ज्ञानसंपादनाच्या सुरुवातीच्या कालखंडात सतावलं होतं. मी कोण, आजूबाजूला, या जमिनीवर, वर आकाशात दिसणाऱ्या या अखिल विश्चात माझं नेमकं स्थान काय आहे, या विश्वाशी माझं नातं कोणतं आहे, माझा या विश्वावर आणि त्या विश्वाचा माझ्यावर नेमका कोणता प्रभाव पडतो आहे, मी कोठून आलो, कुठे जाणार आहे, या माझ्या हालचालींचं नियंत्रण करणं माझ्या हाती आहे की यदृच्छयाच ही सारी भलीबुरी कामगिरी माझ्या हातून घडत आहे, यांसारख्या मूलभूत प्रश्नांची पटणारी उत्तरं शोधण्याचे प्रयास या कालखंडात झाले आणि त्यांची जी उत्तरं दिली गेली, ती बहुधा त्याविषयी केलेल्या तत्त्वचिंतनातून दिली गेली किंवा अनुभवजन्य अनुमानांमधून, ‘एम्पिरिकल कन्सिडरेशन'मधून दिली गेली. तत्त्वचिंतनाची बैठक वैयक्तिक होती, पण त्या चिंतनाचं फलित व्यक्तीपुरतंच सीमित राहणारं नव्हतं. ते सामूहिक होतं. समष्टीला लागू पडणारं होतं. सर्वांनाच ते समजावून सांगणं समाजहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं. त्याचं अनुबोधन गुरुशिष्य परंपरेमधून केलं गेल्यामुळं त्याचा प्रसार झाला. दररोजच्या जीवनकलहातून मुक्त होऊन असं चिंतन साध्य करणारे महाभाग संख्येनं कमीच होते. त्यांनी दाखवलेला मार्ग इतरांनी अनुसरला. त्यांच्या चिंतनाच्या फलिताला या मूलभूत प्रश्नांच्या समर्पक उत्तरांचं स्थान प्राप्त झालं. त्या प्रतीचं चिंतन करण्याची क्षमता असलेला दुसरा कोणी महाभागच त्यामधील काही विसंगतींचा किंवा त्रुटींचा निर्देश करून वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयास करू धजत असे. अनुभवजन्य अनुमानांची स्थिती थोडीशी वेगळी होती. हे अनुभव वैयक्तिक नव्हते. सामूहिक होते. अनेकांना तेच अनुभव वारंवार आले होते. किंबहुना, विज्ञानानं नेहमीच सार्वत्रिक, सार्वकालिक, सामूहिक अनुभवांचाच मागोवा घेतला आहे. त्यातून मग नैसर्गिक आविष्कारांपाठच्या निसर्गनियमांचं जे ज्ञान प्राप्त होतं, त्याचा प्रभाव सर्व समाजावर सारखाच होतो. अशा सार्वत्रिक अनुभवाच्या आविष्कारांची पार्श्वभूमीही ध्यानात आली होती. एका विशिष्ट परिस्थितीत एक विवक्षित आविष्कार होतो याची साक्ष मिळाली होती. वैयक्तिक परिस्थितीवर, गुणवत्तेवर या आविष्कारांचं स्वरूप अवलंबून नव्हतं. त्यातूनच मग कार्यकारणभावाचं अनुमान काढणं शक्य होत होतं. आकाशात नेहमीच दिसणारे सूर्य आणि चंद्र या तेजोगोलांचं स्थान कायमस्वरूपी नाही. ते एका जागी स्थिर राहत नाहीत. त्यांचं अवकाशातलं स्थान बदलत जातं. सर्वानाच याचा अनुभव येतो आणि या बदलांचही एक आवर्तन होतं. त्या शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / २१