पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना कोणत्याही प्रदेशाची जडणघडण अनेक अंगांनी होत असते. त्या जडणघडणीचे अनेक पैलू असतात. 'सब भूमी गोपाल की इसमें अटक कहाँ?' असं अलंकारिक अर्थानं विचारलं जात असलं, तरी आपल्या या धरतीची भूमी सलग, एकसंध नाही हे वास्तव आहे. वैज्ञानिकांना विचाराल तर ते ‘प्लेट टेक्टॉनिक्स' या सिद्धान्ताचा दाखला देत धरतीचा पृष्ठभाग अनेक छोट्या-छोट्या तुकड्यांचा, प्लेट्सचा बनलेला आहे, हे सप्रमाण दाखवून देतील. पण तो विचार बाजूला ठेवला तरी या भूमीवर अनेक कृत्रिम आणि स्वनिर्मित अटका निर्माण झालेल्या आहेत हे वास्तव टाळता येत नाही. __काही सीमारेखा निसर्गानंच आखून दिलेल्या आहेत. भूभागावरून आस्ते कदम करत जावं, तर एका क्षणी तो भूभाग संपून सागराचं साम्राज्य सुरू होतं. तो किनारा मग एक अडसर बनतो. तो ओलांडून सागरावरून सहजगत्या वाटचाल करणं अशक्य बनतं. दुसरीकडे जावं, तर सपाट वाटणारा भूभाग अकस्मात आकाशगामी झेप घेत, वाटेत आडवा येतो. ती उत्तुंग पर्वतराजी उल्लंघून पलीकडे जाणं सहजसाध्य नसतं. ती पार करण्यासाठी एखादी सोईस्कर खिंड सापडत नाही तोवर तो नगाधिराजही एका लक्ष्मणरेखेचं रूप धारण करतो. कुठं घनदाट, निबिड अरण्य मार्ग खंडित करतं, तर कुठं चालणंही अवघड करणारी मरुभूमी. एक ना अनेक. यांसारख्या चतु:सीमांनी आखलेला तो प्रदेश जरासा अलग पडतो, तिथलं हवामान वेगळं असतं, तिथली सजीवसृष्टी आगळी असते. तो प्रदेश मग स्वत:ची वेगळी ओळख सांगू लागतो. पण सगळ्याच अटकसीमा अशा भौगोलिक नसतात, नैसर्गिक नसतात. इतिहास, समाजसंघटना, त्या समाजाचे नीतिनियम, कुटुंबव्यवस्था, अंगीकारलेली जीवनशैली, राहणीमान, आरोग्य, कला, संगीत, साहित्य, अनेक पैलूंनी त्या प्रदेशाची स्वत:ची वेगळी ओळख अधोरेखित होत असते. या प्रत्येक पैलूचे विभ्रम खुलवणाऱ्या, त्यांची झळाळी लक्षणीयरीत्या वृद्धिंगत करणाऱ्या महाभागांना त्या प्रदेशाचे शिल्पकार म्हणणं क्रमप्राप्त होतं. महाराष्ट्राचे असे जे कोणी शिल्पकार आहेत, त्यांचा अल्पचरित्रात्मक परिचय करून देणं हेच या बहुखंडात्मक प्रकल्पाचं अधिष्ठान ठरतं. तरीही, महाराष्ट्र आणि शिल्पकार या दोन कळीच्या शब्दांची नेटकी आणि नेमकी व्याख्या केल्याशिवाय या प्रकल्पाची नांदी म्हणता येणार नाही. महाराष्ट्राची स्वत:ची वेगळी ओळख पटवण्यासाठी ज्या पैलूंचा विचार करावयास हवा, तो करूनच या प्रकल्पातील निरनिराळ्या खंडांची आखणी करण्यात आली आहे; आणि त्या प्रत्येक पैलूच्या विकासात बहुमोल भर घालणाऱ्या दिग्गजांची ओळख शिल्पकार अशी केली गेली आहे. इतर पैलूंबाबत अशी ओळख पटवणं सोपं आहे. कारण, मराठी संगीत, मराठी साहित्य, मराठी समाज, मराठी राजकारण, महाराष्ट्राचा भूगोल यांची वेगळी, स्वतंत्र ओळख पटवणं सहजसाध्य आहे, त्यांची अधिष्ठानं इतर प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळं त्यांचे निकष ठरवणं अवघड जात नाही. विज्ञान आणि सुरुवातीला त्याला समांतर, पण आजकाल त्याचं बोट धरूनच वाटचाल करणारं तंत्रज्ञान, यांच्या बाबतीत ते निकष बाद ठरतात. इंग्रजीत ज्यांना 'नॉनस्टार्टर' म्हणता येईल, असे ठरतात. याचं तसं ठोस कारणही आहे. विज्ञान हे जागतिक, नव्हे वैश्विक आहे, यच्चयावत विश्नाला त्याचे नियमा, त्याचे शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / १९