पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करणारी टिपणनोंद घेतली जाईल याचीही दक्षता घेण्यात आली व अशा सर्व टिपणांच्या सुरुवातीलाच सदरच्या चरित्रनायकाची मुख्य नोंद ज्या खंडात आहे त्या खंडाचे नाव देण्याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. जेणेकरून वाचकांना ती संपूर्ण नोंद त्या त्या टिपणासोबत वाचता येईल. ___ मुख्य चरित्रनोंद ही एकाच खंडात घेण्याचा निर्णय हा मुख्यत्त्वे सामायिक मुद्दयांची उदा. जन्म, बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, मृत्यू यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच घेण्यात आलेला आहे. याचबरोबर मुख्य चरित्रनोंद व टिपणनोंद यांच्या ठिकाणी आणखी एक सुविधा देण्यात आलेली आहे, ती म्हणजे चरित्रनायकाचा एका ओळीत परिचय. हा परिचय वाचल्यानंतर त्या व्यक्तीचे बहुआयामी कार्य वाचकांच्या लक्षात येईल व त्या क्षेत्रांच्या अनुषंगाने त्या त्या विषयांच्या खंडात चरित्रनायकाच्या टिपणनोंदी त्यांना वाचता येतील. ___ या टिपणनोंदीत नेमकेपणाने चरित्रनायकाच्या त्या विशिष्ट क्षेत्रातील कार्याची माहिती देईल व त्या व्यक्तीच्या मुख्य नोंदीत त्याचा चरित्रविषयक तपशील व सोबत त्याचे छायाचित्र देण्यात येईल असा निर्णय साहित्य खंडाच्या निर्मितीच्या वेळेस घेण्यात आला होता. पण काही चरित्रनायकांच्या कार्याला, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीला विशिष्ट पार्श्वभूमी असते. त्या विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्या व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक असते आणि त्याच्या कार्याचे मूल्यमापन त्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात करणे उचित असते. अन्यथा अर्धवट माहितीच्या आधारावर चुकीची प्रतिमा वाचकांच्या मनात निर्माण होण्याचा धोका संभवतो. यावर साधकबाधक विचार करून या खंडात दोन महत्त्वाचे बदल स्वीकारण्यात आले आहेत. पहिला बदल म्हणजे चरित्रनायकाच्या कार्याची पार्श्वभूमी विशद होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात पुनरुक्तीचा दोष पत्करून पुरेशी माहिती टिपणनोंदीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच वाचकांच्या सुविधेसाठी या टिपणनोंदीसोबत संबंधित चरित्रनायकांची छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. शिक्षण खंडाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे यातील काही नोंदीत जोडचरित्रे देण्यात आलेली आहेत. जर पती आणि पत्नी मिळून अथवा दोन भगिनींनी मिळून एखाद्या कार्याची उभारणी संयुक्तपणे एकमेकांच्या सहकार्याने केली असेल अथवा एकाच कार्याला वाहून घेतले असेल तर त्यांची एकत्रित नोंद येथे घेण्यात आलेली आहे. कारण या दोन चरित्रनायकांचे एकूण कार्यातील नेमक्या सहभागाचे मूल्यमापन करताना त्याच्यावर अथवा त्याच्या सहयोगी चरित्रनायकावर अन्याय होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून वेगवेगळी चरित्रे घेण्याऐवजी या जोडचरित्रांच्या नोंदी संपादक मंडळाच्या निर्णयानुसार येथे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. चरित्रनोंदींचे स्थूल स्वरूप चरित्रकोशातील नोंदींचे स्थूल स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. कोशातील नोंदी सर्वसाधारणपणे आडनावांनी दिल्या आहेत. पहिल्या ओळीत चरित्रनायकाचे नाव (आडनाव प्रथम) दिले आहे. त्यानंतर खालच्या ओळीत त्याचे टोपणनाव दिलेले आहे. तसेच या टोपणनावांनी नामोल्लेख नोंदीही देण्यात आलेल्या आहेत. कारण काही चरित्रनायकांचे मूळ संपूर्ण नाव वाचकांना माहीत नसते वा अन्य नावांनीही ते चरित्रनायकांना ओळखत असतात. त्यासाठी येथे अशी काळजी घेण्यात आलेली आहे. उदा. छत्रे, विनायक लक्ष्मण केरूनाना छत्रे १० / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश