पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खांडेकरांच्या रूपककथांत आत्यंतिक जीवनवाद भरलेला दिसून येतो. ते ‘जीवनासाठी कला' मताचे समर्थक होते. त्याचे प्रत्यंतर रूपककथांतही येते. या कथा अल्पाक्षरी असल्या तरी जीवनाचं त्यांचं भाष्य मोठं गहिरं असतं. एका अर्थाने रूपककथा ही भाष्यकथाच असते. तिच्यात वाचकांशी हळुवार साद घालण्याची शक्ती असते. खांडेकरांनी अनेक गुजगोष्टी लिहिल्या. त्यामुळे वाचकांशी संवाद साधण्याचं मोठं कसब त्यांच्या लेखणीत आढळतं. खांडेकरांच्या रूपककथांत माणसाच्या विसंगतीवर, वर्मावर बोट ठेवण्याची अचूकता दिसून येते. त्यात प्रहाराची आक्रमकता नसते. संवादातील गोडवा व गांभीर्य यांचा सुंदर मिलाफ खांडेकरांच्या रूपककथांत दिसून येतो. शोभादर्शकाप्रमाणे शत-शत बिंबे निर्माण करण्याची कला साधलेल्या खांडेकरांच्या रूपककथा म्हणजे चमत्कृत नृत्य असतं. ती माणसाच्या दांभिकपणाचा बुरखा फाडते तशी माणसाची संवेदनाही रेखांकित करते. तिच्यात एक आश्वासक वृत्ती असते. ती नवे किरण दाखवते. खांडेकरांच्या रूपककथा केवळ मृगजळातील कळ्या असत नाहीत. त्या जीवनाला फुलविणा-या कलिका असतात. जीवनाच्या सोनेरी सावल्या दाखवत त्या जीवनाच्या वेचलेल्या फुलांचे सर्वंकष सौंदर्य घेऊन येतात. वानगीदाखल एक-दोन रूपककथा वाचल्या, ऐकल्याशिवाय त्यांची नजाकत, नाजूकपणा आपल्या लक्षात येणार नाही.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/८५