पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावित करते, वेड लावते की ती वारंवार तुम्ही वाचता. वारंवार आरशात पाहण्यासारखं असतं हे. आपण आरशात प्रत्येकवेळी वेगळे दिसतो, असतो, बोलतो. तसं पुस्तकंही प्रत्येक वेळी नवा अर्थ, आशय, दृष्टी, विचार देत राहतात, असा माझा अनुभव आहे. 'ज्वाला आणि फुले', ‘प्रोफेट’, ‘कुरल' ही अशी पुस्तके होत की जी मला रोज नवं देत राहतात.
 काही लेखक तुमचं जीवन बदलतात. कबीर, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, यशपाल, खलील जिब्रान यांनी माझं जीवन बदललं. त्यांच्याबद्दल मी वेळोवेळी भरभरून (प्रसंगी भारावूनही!) लिहिलं, आणि काही केलं आहे. साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांचे स्मृती संग्रहालय उभारणं, हे मी माझ्या आयुष्यातलं पुढच्या पिढ्यांसाठी केलेलं उतराईचं काम, कृतज्ञता कार्य, ऋणमुक्ती मानतो! एक लेखक जरी तुम्ही आयुष्यभर समग्र समजून घेतला तरी तुमचं जीवन बदलून जातं. वि. स. खांडेकर, साने गुरुजी यांच्या विचार शाळेत मी शिकलो. वि. स. खांडेकर, साने गुरुजी मी समग्र वाचले. वि. स. खांडेकर तर मी किती परीने अनुभवले. त्यांनी मला शिकवलं. मी त्यांची भाषणं ऐकली. मी त्यांच्याशी बोललो, त्याचं साहित्य, संपादन, संशोधन, समीक्षा, अनुवाद, संकलन काय नाही केलं? त्यांच्या स्मृती संग्रहालयाची शिवाजी विद्यापीठातील उभारणी आणि त्यांच्या समग्र अप्रकाशित, असंकलित साहित्याचे संपादन म्हणजे त्या लेखकाप्रती पूर्ण भाव व्यक्त करणं ठरलं... माझ्यापुरतं तरी! यातील काही लेख त्याची प्रचिती देतील. तोच अनुभव साने गुरुजी स्मृती संग्रहालयाच्या साधन संशोधन व संकलनाचा. त्यातील निरीक्षणं या संग्रहातील दोन लेखात 'दैनंदिनी' व 'बारनिशी' मध्ये वाचण्यास मिळतील. यातून ते लेखक, त्यांचं व्यक्तिमत्त्व, विचार, जीवनमूल्ये तुम्हास समजतील. मी छंद म्हणून कधीच लिहिलं नाही. प्रत्येक लेखनामागे ध्येय, उद्देश, मूल्यं होतं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की, मी साहित्यिक नाही. कारण मला कल्पनेनं, प्रतिभेनं लिहिता येत नाही. ललित लिहिणं माझा पिंड नाही. जीवनास आकार, उकार, विचार, दृष्टी देणारं लिहिणं म्हणजे साहित्य अशी माझी धारणा आहे. मी कविता, कथा, नाटिका लिहिल्यात. अगदी लावणीही लिहिली. पण ती माझी प्रकृती नव्हे हे निश्चित. तसा मी केवळ लेखक आहे.
 यात काही वैचारिक, ऐतिहासिक, समीक्षात्मक लेख आहेत. त्याबद्दल लिहिलंच पाहिजे. कबीर, नारायण सुर्वे हे माझ्या कुळातले किंवा मी त्यांच्या कुळातला. त्यांच्याप्रमाणे मला वंचित आयुष्य लाभलं. त्यांच्या