पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला. पूर्वी उर्दू मुशायरे व्हायचे. मग हिंदी कवी संमेलनं होऊ लागली. अशा लेखनातून साहित्य स्मृती, इतिहास जपला, जोपासला जातो अशी माझी धारणा आहे. शब्द सोन्याचा पिंपळ होतो तो असा!
 वाचन काय आहे? छंद, व्यसन, व्यासंग, परिपाठ, सत्संग, सहवास, नाद, वेड, विचार, क्रिया, हितगुज, संवाद, आत्मलाप काय आहे? नुसत्या या शब्दांतूनही तुम्हास वाचनाच्या व्यापकतेचं भान आल्याशिवाय राहणार नाही. वाचन समाधी असते. साधन असते. शिळोप्याचं साधन असतं. तो विरंगुळा असतो. एकांत सोबत असते वाचन. व्हॉल्ट व्हिटमन म्हणाला होता, 'Who touches the book, touches the heart' जो पुस्तकास स्पर्श करील, त्यात हृदयाला हात घालण्याची क्षमता येईल. वाचकच हृदयस्पर्शी संवाद करू शकतो. प्रसंगी अखंडित वाचित जावे' असं कवी म्हणतो तेव्हा त्याला वचन ही नित्य नि निरंतर क्रिया (कर्मकांड नव्हे!) वाटत असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. यावर यातील अनेक लेखांमध्ये विस्तारानं लिहिलं गेलं आहे.
 जे वाचनाचं, ते लेखनाचं. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे' शीर्षक लेख वाचाल तर ते स्पष्ट होईल. एकदा का तुम्ही लिह लागलात की, मग तुम्हाला लिहिल्याशिवाय चैनच पडणार नाही. माझे लेखन सुरू झालं ते तारुण्यातील हुरहर, जिज्ञासा, भय इत्यादी अस्वस्थतेतून. मी एकाच काळात कविता लिहिल्या व मनाचं काहूर गद्यातही लिहिलं. लेखन अनेक प्रकारचे होत जातं. कारण आपलं जीवन व्यामिश्र असतं. या संग्रहातले नुसते सर्व लेख पाहिले तरी त्यांचे विषयवैविध्य तुमच्या लक्षात येईल. लेखक गायकासारखा असतो. गायक एक गाणं अनेक चालीत, रागात सादर करतो तसा लेखक आपलं म्हणणं, सांगणं, विचार, कल्पना अनेक परीनं, रूपानं व्यक्त करतो. कहाणी किती रूपांनी व्यक्त होते - कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, आत्मकथा, चरित्र, काव्य, महाकाव्य. या संग्रहात अनेक चर्चित साहित्यिक व त्यांच्या साहित्य कृतींबद्दल लिहिलं गेलं आहे. आर्मेनियन (सिरियन) कवी खलील जिब्रानचं महाकाव्य ‘प्रोफेट', मराठीतील पहिलं स्त्री आत्मकथन ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या साहित्य रचनेला २०१० साली शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांपूर्वीचं समाजजीवन या आत्मकथेत प्रतिबिंबित आहे. शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती वाचताना अंगावर काटे उभे राहतात. लेखक आपला अनुभव इतरांना वाटण्यासाठी, देण्यासाठी लिहितो त्याचं हे उदाहरण. एखादी साहित्यकृती तुम्हाला इतकी