लोकांना अधिकाराची जाणीव असते, ते कार्यप्रेरित होतात आणि काम करतात.
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे विकासाची जाणीव - वाढीची भावना : मी या इथे काम करतो, मी इथे वाढतो आहे, मी नवे काहीतरी शिकत आहे. हे फार मोठे कार्यप्रेरक आहे. विशेषतः तरुणमंडळींसाठी. आजचे तरुण फार महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना अगदी थेट सर्वोच्च पदापर्यंत जायचं असतं. जरी ते आहेत त्या कंपनीत सर्वात वरच्या पदापर्यंत पोहोचले नाहीत तरी ते मनावर घेत नाहीत; ते दुस-या कंपनीचा विचार करतील. त्यांनी वर जायलाच हवं. जोवर त्यांना वाटत असतं की ते नवीन काहीतरी शिकत आहेत तोपर्यंत ते कार्यप्रेरित राहतात आणि काम करायला तयार असतात. जेव्हा त्यांना वाटतं की त्यांची वाढ खुटली आहे, त्यांची प्रगती होत नाही तेव्हा कार्यप्रवणशून्यता येऊ लागते.
या बाबतीत, तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वत:च्या कारकिर्दीचा विचार करायला हवा. काही वेळा जेव्हा तुम्ही तुमची कारकीर्द सुरू करता तेव्हा तुम्हांला असा वरिष्ठ अधिकारी मिळतो, जो म्हणतो, “तू बुद्धिमान तरुण असावास असं वाटतं. जाऊन आपली कामे कर. जर तुला काही अडलं तर मला येऊन भेट." तुमचा विकास होत राहतो आणि तुम्ही कार्यप्रेरित होता. केवळ साडेसहा किंवा आठ तासच नव्हे, तर नऊ तास, दहा तास, अकरा तासही काम करता! त्यानंतर तुम्हांला असा वरिष्ठ अधिकारी भेटतो; जो म्हणतो, “हे काम तुम्ही यापूर्वी केलंय का? नसेल, तर मी हे काम दुस-या कुणाला तरी करायला सांगतो. किंवा मी स्वत: करतो." किंवा तुम्हांला असा तिसरा वरिष्ठ अधिकारी भेटतो जो तुम्हांला म्हणतो, “जरी हे काम तुम्ही यापूर्वी केलेलं असलं तरीही ते माझ्याकडून तपासून घ्या. बाहेरच्यांना पत्रे पाठवू नका. मला पत्राचा मसुदा द्या. मी पत्र पाठवीन." हे ऐकून तुम्ही पूर्णपणे कार्यप्रेरणाशून्य होता आणि तुमची अशी भावना होते की तुम्ही कमी विकसत आहात. खरं तर तुमचे सामर्थ्य, कर्तृत्व कमी होत आहे! यावेळी तुम्ही प्रत्येक प्रकारची रजा घ्यायला लागता. हक्काची रजा, आजारपणाची रजा, नैमित्तिक रजा.
एके दिवशी मला एक कारकून भेटला. तो म्हणाला, “सर, या वर्षी मी माझ्या आजारपणाच्या रजेची मजा चाखली नाही." मी म्हणालो, “मला यापूर्वी अजिबात माहीत नव्हतं की लोकांना त्यांच्या आजारपणाच्या रजेतून मजा मिळते." पण त्या तिस-या वरिष्ठ अधिका-याच्या हाताखालील लोक खरोखरीच त्यांच्या ‘आजारपणाच्या रजेतून' मजा मिळवायची शक्यता आहे!