पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रारंभीचे शब्द

अकरा

वरिष्ठ अधिका-याने करायला हव्यात अशा सुधारणांची प्रत्येकाकडे एक यादी असते. कालांतराने वरिष्ठ अधिकारी सुधारण्याची शक्यता असली तरीही ही सुधारणा खूप कमी आणि धिम्या चालीने होणे अटळ आहे. याचं कारण असं की वरिष्ठ अधिकारी हे (तुलनेने) अधिक यशस्वी झालेले असतात. आणि यश एक वाईट शिक्षक आहे. यश काही करायचा एक मार्ग शिकवते आणि इतर प्रत्येक मार्गाला हटवादी विरोध करते. व्यवस्थापकाचे मूळ काम हे आवश्यकरीत्या स्वतः आत्मपरीक्षण करून स्वत:ला सुधारणे हे आहे. एक कवी म्हणतो त्याप्रमाणे :

मिटा दे अपनी गफलत, फिर जगा अरबाब गफलत को,
उन्हें सोने दे, पहले ख्वाबसे बेदार तू हो जा।

  (आधी दुस-यांच्या गोंधळाची चिंता करण्यापूर्वी स्वत:च्या गोंधळाची काळजी घे,
 त्यांना झोपू दे, आणि तुझ्या स्वत:च्या स्वप्नापासून सुटका मिळव.)
 जेव्हा मी एम.बी.ए.ला शिकवीत होतो तेव्हा शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठीच्या शेवटच्या लेक्चरला मला वारंवार या प्रश्नाचं उत्तर देणं भाग झालं होतं : “सर, आम्ही आता व्यवस्थापक होणार आहोत-आम्हांला आमच्या यशासाठी तुम्ही काय ‘टिप्’ देता?
  “पहिली ‘टिप्' म्हणजे टिप्स् मागू नका." मी उत्तर द्यायचो. “दुसरी आणि शेवटची टिप म्हणजे तुम्ही एक वही ठेवा. या वहीत तुमच्या अवतीभोवती चाललेल्या चांगल्या किंवा वाईट व्यवस्थापनाची नोंद ठेवा. उदाहरणार्थ, जर इतरांसमोर वरिष्ठ अधिका-याने जर हाताखालच्या व्यक्तीची प्रशंसा केली तर कृपया त्याची या वहीत नोंद करा आणि जर एखादा वरिष्ठ अधिकारी हाताखालच्या व्यक्तीवर ओरडला किंवा बरोबरीने काम करणाच्या सहकाच्याबरोबर भांडला तर त्याचीसुद्धा नोंद ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ह्या नोंदी वाचा आणि योग्य प्रसंगी तुम्ही स्वतः यातील 'चांगले किंवा 'वाईट' व्यवस्थापन करता की कार्य ते तपासा. याने तुम्हांला गतकालीन गोष्टींचे अवलोकन करून आपण कोठे चुकलो याची समज (पश्चातदृष्टी) येईल. काही काळानंतर तुम्हांला ‘मध्यदृष्टी' प्राप्त होईल–प्रत्यक्ष कामात तुम्ही कसे, कोणत्या मार्गाने वाटचाल करीत आहात ते काम करता करता समजेल. सरतेशेवटी तुम्हांला 'दूरदृष्टी' प्राप्त होईल–समस्या आणि संधी यांची अटकळ बांधून तुमची धोरणे ठरविण्याची कुवत येईल. व्यवस्थापनातील ही खरी बिकट बाब आहे."