व्यवस्थापकीय वर्तुळांमध्ये 'कामाची सोपवणूक करणे' हे बहुतांशी सैद्धान्तिक स्वरूपाचे असते. याविषयी विविध चर्चासत्रात खूप बोलले जाते. त्यात तज्ज्ञमंडळी कार्यरत अधिका-यांना खालील बाबी साध्य करण्यासाठी शक्य तितक्या कामाची सोपवणूक करायला सांगतात :
• प्रमाणाबाहेर काम करण्यापासून सुटका मिळविणे.
• निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला वेग देणे.
• हाताखालील अधिकारी तयार करणे.
या चर्चासत्रांना येणारे प्रतिनिधी हा सल्ला पाळायचा आणि त्यानुसार कृती करायचा निश्चय करतात, पण जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात परत येतात तेव्हा शक्य तितक्या कमी कामाची, अधिकाराची सोपवणूक करतात.
याला कारणीभूत असलेले चार निष्कर्ष देता येतील.
१) कामाच्या, अधिकारांच्या सोपवणुकीविषयी झालेला गोंधळ.
२) हाताखालची व्यक्ती सोपविलेले काम नीट करणार नाही अशी वाटत असलेली भीती,
३) हाताखालची व्यक्ती सोपविलेले काम अधिक चांगल्या प्रकारे करील ही वाटत असलेली भीती.
४) सोपविलेले काम स्वीकारायला हाताखालची व्यक्ती तयार नसणे.
या बाबी एकमेकांपासून स्वतंत्र नाहीत. मात्र, यापैकी प्रत्येक बाबीचा कामाची सोपवणूक न करायच्या एकूण प्रक्रियेवर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी त्यांचे वेगवेगळे विश्लेषण करणे जरुरीचे आहे.