पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५८

व्यवस्थापनाची मूलतत्त्वे

 समस्येचं विश्लेषण होताच उपाययोजनाही सहज स्पष्ट झाली. कामगारांच्या कुटुंबांसाठी त्यांनी कामगार कॉलनीत परत यावे म्हणून प्रति-आकर्षण निर्माण करणे. यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना होती. अल्पकालीन उपाययोजना होती ती म्हणजे, कामगारांच्या कॉलनीत रविवारी संध्याकाळी चित्रपटाचा खेळ ठेवणे. या प्रति-आकर्षणामुळे गावात राहणं वाढविण्याऐवजी कामगारांची कुटुंबे आता रविवारी दुपारीच कामगार कॉलनीत परतायचा आग्रह धरतील.
 दीर्घकालीन उपाययोजना होती ती म्हणजे कामगारांच्या बायकामुलांसाठी कॉलनीत क्लबांद्वारे काही कार्यक्रम ठेवणे, जेणेकरून कामगारांना परस्परसंबंधासाठी निकटची मंडळी कॉलनीतच मिळतील आणि गावाकडे होणाच्या त्यांच्या फेच्या कमी होतील.
 दुस-या एका गैरहजेरीच्या समस्येत कामगार हे आदिवासी गावे, पाडे यांतून यायचे. त्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण ३० टक्के होते ते पुढे पगाराच्या दिवसांनंतर ५० टक्क्यांपेक्षा जास्त व्हायचे. गैरहजेरीमुळे उत्पादनात निर्माण झालेल्या अडचणींची चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांच्या नेत्यांना बोलावून घेतले. त्यांना सांगण्यात आले की गैरहजेरीचे असेच प्रमाण राहिले तर कारखाना बंद पडायची शक्यता आहे. याचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही. ते म्हणाले की कारखाना बंद पडणं ही कामगारांसाठी नव्हे, तर व्यवस्थापकांसाठी समस्या असेल. कारखाना येण्याच्या कित्येक शतकांच्या पूर्वीपासून ते कामगार ज्या जंगलात जात होते तिथे जाऊ शकतात. पण व्यवस्थापकांना समस्या निर्माण होईल. कारण कारखाना आहे म्हणून ते तिथं आहेत. यावर त्यांना ते कामाच्या सर्व दिवशी हजर कां राहत नाहीत ते विचारण्यात आले. ते म्हणाले की ते त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नसतं. ते दररोज २५ रु. कमावतात आणि कामाच्या २६ दिवसांपैकी १६ दिवस काम करतात आणि ४०० रु. दर महिन्याला कमावतात. कुटुंबाला २५० रु. लागतात आणि उरलेले १५० रु. ते दारूवर खर्च करतात. जर त्यांनी सगळे २६ दिवस काम केलं तर त्यांना ४०० रु.हून जास्त पैशाची दारू प्यावी लागेल आणि ते त्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत हानिकारक ठरेल. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही ते ज्यादा पैसे मुलांच्या शिक्षणावर किंवा टी.व्ही., फ्रीज वगैरे घेऊन जीवनमान उंचाविण्यावर का खर्च करीत नाहीत? ते म्हणाले की त्यांच्या मुलांना यापूर्वीच शिक्षण मोफत आहे आणि वीज नसल्यामुळे आधुनिक इलेक्ट्रिक वगैरेच्या वस्तू त्यांच्या कामाच्या नाहीत.
 इथे समस्या आहे - कामगारांना ज्यादा कमाई खर्च करण्यासाठी मार्ग नाही. आम्ही एक प्रयोग करून पाहिला. आम्ही आजूबाजूच्या शहरांतील काही विक्रेत्यांना कारखान्यात येऊन कामगारांना हप्त्यावर स्टीलची भांडी (उदा. जेवणाचा डबा) आणि चांदीचे दागिने देण्यासाठी सांगितले. अनेक कामगार मोहात पडले आणि हप्त्याची