पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०

व्यवस्थापनाची मूलतत्त्वे

आवश्यक उपाययोजना करील. ते दोघे एकत्र बसून चर्चा करतील आणि गरज असल्यास वरिष्ठ अधिका-याकडे जाऊन समस्या शेवटी सोडवतील. त्वरित सोडवायच्या समस्येसाठी ते अल्पकालीन उपाययोजना करतील आणि अशी समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमीतकमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करतील.
 दुसरीकडे, परिणामकारक नसलेल्या संघटनेत, विक्री व्यवस्थापकाला झालेली चूक कळताच तो सचिवास बोलावून मेमो लिहायला सांगतो :

 "प्रति, उत्पादन व्यवस्थापक,
 संदर्भ : माल पाठवणीतील चुका.
 परिच्छेद १ : आपल्या विभागाने एका महत्त्वाच्या सामग्री पाठवणीत खालील मोठीच चूक केलेली आहे.
 परिच्छेद २ : अशा चुका आपण नेहमी करता. उदा. अ, ब, क... (पूर्वीची उदाहरणे)
 परिच्छेद ३ चुकांच्या या पुनरावृत्तीमुळे आमच्या नित्य विक्रय कामात मोठीच अडचण येते आणि परिणामी विक्रीत बाधा येते.
 सही - विक्री व्यवस्थापक
 आणि हे न चुकता प्रत यांना सादर ....!"

 असा मेमो उत्पादन व्यवस्थापकास मिळताच, त्याचे असे उत्तर लिहिले जाते :

 "प्रति : विक्री व्यवस्थापक
 संदर्भ : माल-पाठवणीतील कथित चूक.
 परिच्छेद १ : आपल्या विभागाने केलेल्या चुकीमुळेच प्रस्तुत चूक झालेली आहे.
 परिच्छेद २ : आपल्या विभागाने पाठविलेल्या ग्राहकांच्या माहितीशी आमच्या माल पाठविण्याच्या कामाचा थेट संबंध असतो, हे आपल्याला मान्य व्हावे.
 ...... प्रत यांना सादर..."

 अकार्यक्षम संघटनांमध्ये मेमोंचे हे युद्ध ही नेहमीचीच बाब असते. लोकांना येथे समस्या सोडविण्यात रस नसतो तर सबबी आणि बळीचे बकरे शोधण्यात त्यांना आनंद होतो. कार्यक्षम संघटनांमध्ये थेट सुसंवाद साधून प्रश्न सोडविण्याची कार्यपद्धती असते आणि या उद्देशाने लोकांना एकत्र काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.