Jump to content

पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
व्यवस्थापकाचा उदय

१३

निवडले आहे, आणि त्यामुळे त्यांना निवडणाच्या व्यवस्थापनाचा त्यांच्यावरील विश्वास सार्थ करायलाच हवा असे त्यांना वाटले. त्यांच्या उत्पादकता-वाढीमागील हे एक महत्त्वाचे कारण होते. हे कामगार एक गट म्हणून काम करू लागल्याने त्यांच्यात एकसंधतेची भावना विकसित झाली. त्यांपैकी एखादा कामगार आजारपणामुळे गैरहजर राहिला तर इतर कामगार अधिक काम करून आजारी कामगाराच्या कामाची भरपाई करीत आणि उत्पादनाची पातळी खाली येऊ देत नसत. खरं तर, 'सामाजिक प्रेरणा' हा काही नवा शोध नव्हता. अनादी काळापासून कामाच्या हेतूविषयी जाण आणि जबाबदारीची भावना यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि प्रमाण वाढते याची लोकांना उत्तम जाण होती. तोपर्यंत व्यवस्थापकांच्या समस्या या बव्हंशी यांत्रिक स्वरूपाच्या होत्या. व्यवस्थापकाला खालील बाबी ठरवून द्याव्या लागत असत :
 ० वेळ
 ० नेमून द्यायचे काम आणि
 ० कामाची सर्वोत्कृष्ट पद्धत.
 पण आता प्रेरणा निर्माण करण्याची अवघड समस्या उभी राहिली आणि आजपावेतो व्यवस्थापक या समस्येशी झगडत आहेत. कामगार संघटना आणि आर्थिक विकास यामुळे भय आणि पैसा महत्त्वाचे प्रेरक राहिलेले नाहीत. जबाबदारी आणि संघभावनेचा दबाव यांची प्रेरकशक्ती वाढत आहे.

संक्रिया संशोधन (ऑपरेशन्स रिसर्च) आणि संगणक (कॉम्प्यूटर) यांचा उदय

दुस-या महायुद्धानंतर व्यवस्थापकांच्या भूमिकेत आणखी एक महत्त्वाचा बदल झाला. तो संक्रिया संशोधन आणि संगणकाच्या आगमनामुळे. संक्रिया संशोधन म्हणून ओळखली जाणारी गणिती तंत्रे म्हणजे व्यवस्थापकीय समस्या सोडविण्याचे आदर्श गणिती नमुने होते. प्रारंभी, संक्रिया संशोधन हे विद्यालयीन संशोधनापुरतेच होते. एखाद्या लहानशा उत्पादन-योजनेसाठी किंवा शिल्लक साठ्याच्या नियंत्रणाच्या समस्येसाठी केवढी तरी आकडेमोड करावी लागे. जलद आणि अचूक आकडेमोड कठीण होती आणि त्यामुळे या तंत्रांचा उपयोग करणे सोपे नव्हते. पण एकदा संगणक आला आणि या सर्व गोष्टी शक्य झाल्या. उत्पादन प्रक्रियेचे सुद्धा स्वयंचालन झाले आणि एका वेळी अशी कल्पना पसरली की सगळ्या उत्पादकतेच्या समस्या संपल्या आणि उत्पादकता आता माणसावर अवलंबून राहणार नाही. जर तुमच्याकडे योग्य प्रकारचा संगणक असेल तर मग काहीच समस्या उरणार नाहीत.