"तेच ते." तो म्हणाला, “तुम्ही निष्ठा दाखवा. तुम्हांला उलटपक्षी निष्ठा मिळते."
‘निष्ठा देणे' यातून काय म्हणायचंय त्याला? मला २० वर्षांपूर्वीचा माझा एक अनुभव आठवतो. मी पहिल्यांदा विक्रम साराभाई अवकाश केंद्रात गेलो होतो. डॉ. वसंतराव गोवारीकर संचालक होते. मी तेथे पाहिलं की अवकाशशास्त्रज्ञ रोज (शनिवार-रविवारीही) सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत काम करताहेत. मला नेहमी जाचक प्रश्न विचारायला नेहमी आवडतं. मी त्यांना विचारलं, “तुम्ही रविवारी सुद्धा का काम करता? तुम्ही तर सरकारी नोकर. तुम्हांला रविवारी काम करायची गरज नाही." ते म्हणाले, “आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही - आमचा वरिष्ठ अधिकारी कडक माणूस आहे." मी म्हणालो, “तो काय करू शकतो? तुम्हांला रविवारी काम न केल्याबद्दल कामावरून काढू शकतो?" (यांतील अनेक शास्त्रज्ञांकडे अमेरिकेतून नोक-यांसाठी आमंत्रणपत्रे होती - कोणत्याही दिवशी दहा पट पगारावर रूजू व्हा म्हणून सांगणारी) मी विचारलं, “तुम्ही कसली काळजी करताय?"ते म्हणाले, "तुम्हांला नाही समजणार ते!" त्यापैकी एकजण म्हणाला, “चार महिन्यांपूर्वी संचालकांनी आम्हांला एके रविवारी बोलावून काम द्यायला सुरुवात केली. मी म्हणालो, “सर, गेल्या चार महिन्यांपासून आम्ही आठवड्याचा प्रत्येक दिवस काम करीत आलो आहोत. आम्हांला कधीच ‘रजा' मिळालेली नाही. आज मी माझ्या मुलांना सहा वाजता कार्टून फिल्म पाहायला न्यायचं कबूल केलंय.' (व्हिडीओ येण्यापूर्वीचा तो काळ होता. तुम्हांला मुलांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात न्यावे लागे.) संचालक म्हणाले, 'ठीक आहे! पावणे सहापर्यंत काम संपवायला तुला कुणी अडविलंय - चित्रपट तर सहा वाजता आहे.' आता यावर तुम्ही काय वादविवाद करू शकणार?" त्याने काम सुरू केलं, काम संपविलं आणि घड्याळात पाहिलं - आठ वाजलेहेत! तो घराकडे धावला, दरवाजा उघडताच त्याने पाहिलं की त्याची बायको काहीतरी विणत बसली होती; मुलं कुठे आहेत असा प्रश्न विचारणं अशक्यच, बॉम्बचा फ्युज उडविण्यासारखंच आहे ते! बायकोने त्याच्याकडे पाहून विचारले,
"तुम्हांला भूक लागलीय?" काय बोलावं हे त्याला कळेना. 'हो' किंवा 'नाही' या दोनपैकी कुठच्याही उत्तराने त्याची पंचाईत होणार होती. ती म्हणाली, “तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच जेवण वाढते मी. पण तुम्ही थांबू शकाल तर मुलांबरोबर जेवू