‘कारणे दाखवा' नोटीस देण्याची गरज नसते. जेथे त्याच्या मनाला लागेल, अशा त्याच्या मर्मावर बोट ठेवल्यास पुरते.
काही वर्षांपूर्वी व्यवस्थापनावर अति सोपे केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते-एक मिनीट व्यवस्थापक (वन-मिनीट मॅनेजर)-त्या पुस्तकाने अर्थपूर्ण परंतु मजेशीर संदेश दिले होते. त्यानुसार, “एका मिनिटाच्या व्यवस्थापकाने एका मिनिटात कामाचा उद्देश समजावयास हवा. जर त्याच्या हाताखालच्या माणसाने ते काम व्यवस्थितपणे केले तर त्याला त्याने एका मिनिटात शाबासकी द्यायला हवी आणि व्यवस्थितपणे केलं नाही तर एका मिनिटात बजावून सांगायला हवे." व्यवस्थापक सर्वसाधारणपणे काय करतात ते आपण पाहू या. ब-याच वेळा व्यवस्थापक हाताखालील व्यक्तीला एकाच वेळी अनेक कामे देतो. एका हाताखालील व्यक्तीला पाच कामे देण्यात आली असतील, तर संध्याकाळी ती व्यक्ती येऊन म्हणते, “मी चार कामे पूर्ण केली आहेत - केवळ एकच उरलंय." यावर तो व्यवस्थापक काय म्हणतो? “ओह नो! ते पाचव काम तर आजच पूर्ण व्हायला हवं होतं. ती दुसरी चार कामे उद्या करता आली असती!" हे खरं तर त्या व्यवस्थापकाने त्या हाताखालच्या व्यक्तीला सकाळी सांगायला हवं होतं. ब-याच वेळा व्यवस्थापक इतक्या शब्दांत काम समजावून सांगतो की ती हाताखालील व्यक्ती पुरती गोंधळते. ‘एक मिनीट व्यवस्थापक' यात म्हटल्याप्रमाणे एकावेळी एकच काम द्यावे, तुमच्या हाताखालील व्यक्ती ते चांगल्या रीतीने करण्याची खूप शक्यता असते. जर त्याने ते काम व्यवस्थित रीतीने केले, तर त्याची एका मिनिटापुरती प्रशंसा करावी. प्रशंसा करायला व्यवस्थापक नेहमी विसरतात. काही वेळा त्यांना वाटतं की काम करण्यासाठी तर हाताखालच्या मंडळीला पगार मिळतो - मग प्रशंसा वगैरे कशासाठी? कधीकधी तर त्याला वाटतं की त्याने प्रशंसा केली तर हाताखालची व्यक्ती पगारवाढ किंवा बढतीची मागणी करील. त्यामुळे प्रशंसा करणे तो टाळतो. मात्र, जेव्हा बजावून सांगायची वेळ येते तेव्हा मात्र तो बरंच काही सुनावतो. मागे एकदा मी माझ्या बायकोला घरगड्याला बजावून सांगताना ऐकलं. त्याने काहीतरी चूक केली होती. ती म्हणाली, “तु आजच नाहीस; तर काल, गेल्या आठवड्यात तीनदा, गेल्या महिन्यात पाच वेळा ही चूक केली आहेस!" तो कामावर आल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच तिने त्याला त्याच्या चुकांची भली मोठी यादी ऐकविली. शेवटी ती म्हणाली, “तुझी नाही - ही माझीच चूक! तुला ओळखून असताना मी तुला हे काम द्यायलाच नको होतं!" अशा बजावून सांगण्यान काय होतं हे तुम्ही पाहू शकता - असं एक लांबलचक बजावून सांगणं की, 'तू केलंस तेच केवळ चुकीचे नाही, तू स्वत:च चुकीचा माणूस आहेस.' मग या व्यक्तीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता फार कमी असते.