म्हणाल तर तो उद्याचाच; पुढला सोमवार अधिक व्यवहार्य ठरेल; पुढला महिना म्हणाल तर आरामदायक ठरेल आणि पुढल्या महिन्यासारखं दुसरं काहीच नाही!!!" आणि जरी त्याने पुढल्या बुधवारी म्हटलं, तरीही पुढल्या बुधवारी काम होऊन तयार असतं म्हणाल? जर तुम्ही बुधवारी जाऊन त्याच्याकडे कामाची मागणी केलीत तर तो म्हणेल, “तुम्ही मला सोमवारी भेटलात तेव्हा काहीच म्हणाला नाहीत; तुम्ही काल मला भेटलात तेव्हाही आठवण केली नाहीत. तुम्ही पाठपुरावा केला नाही."
हे सर्व असे आहे; याला कारण म्हणजे आपल्याभोवतीची बरीच माणसे ही सुस्त असतात!
सुस्त मंडळींच्या अगदी उलट असणारी मंडळी म्हणजे 'व्यस्त' मंडळी. कामात अतिव्यग्र! हातात खूपशी कागदपत्रे घेऊन ते कार्यालयाच्या कॉरिडॉरमधून घाईघाईन फिरत असतात. क्वचितच ते तुम्हांला त्यांच्या खुर्चीत आढळले तर ते फोनवर बोलण्यात गुंतलेले असतात आणि चर्चा करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. त्यांच्याकडे पाठविलेल्या कोणत्याही कागदपत्राविषयी काहीही प्रतिसाद मिळत नाही. ते फारच कामात गुंतलेले असतात. पण दिवसअखेर त्यांनी काय साध्य केलं हे जर तुम्ही तपासलंत तर त्यांची कार्यसिद्धी जवळपास शून्य असल्याचं तुम्हांला आढळेल. ही मंडळी म्हणजे ‘बोगस बँडवाले' असतात!
एका कंपनीत महाव्यवस्थापक पदावर असलेल्या माझ्या एका मित्राने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी बँडची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक बँडमास्तरना बोलाविले. त्याने त्या बँडमास्तरला विचारलं, “तुम्ही किती बँडवाले आणाल?"
"वीस." बँडमास्तरने उत्तर दिलं.
यावर माझा मित्र म्हणाला, “आमच्या उपमहाव्यवस्थापकाच्या मुलीच गेल्या महिन्यात लग्न झालं त्यावेळी त्यांच्या बँडमध्ये वीस बँडवाले होते. मी तर महाव्यवस्थापक आहे. मला तर निदान तीस जण तरी बँडवाले हवेतच."
“ठीक आहे साहेब," तो बँडमास्तर म्हणाला, “मी तीस बँडवाले घेऊन येईन."
लग्नाच्या दिवशी झकपक गणवेश घातलेले आणि हातात विविध वाद्ये घेतलेल्या तीस बँडवाल्यांच्या प्रत्येकी एका रांगेत दहा अशी मिरवणूक निघाली. जेव्हा मी त्यांना बारकाईने पाहिलं तेव्हा मला आढळलं की दोन बाजूच्या बँडवाल्यांच्या रांगाच तेवढ्या वाद्ये वाजवीत होत्या–बँडवाल्यांची मधली रांग केवळ झटपट चालत, जोमदार हावभाव करीत होती–ते वाद्ये वाजवीतच नव्हते. ते बोगस बँडवाले होते!