पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मनुष्यबळ विकास
१८३
 

हाताखालील मंडळींसाठी मनुष्यबळ विकास हा त्या व्यक्तीने किती बदलीमूल्य प्राप्त केले आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे बदली मूल्य ही मनुष्यबळ विकासाची फार महत्त्वाची बाजू आहे.

आरामाचे आनंदमूल्य आणि मनुष्यबळ विकास

शिकण्याची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे आरामाचे आनंदमूल्य. एखादी व्यक्ती जेव्हा काम करीत असते तेव्हा तिला योगदान वाढविण्यासाठी योगदानमूल्य शिकणे महत्त्वाचे असते. कालांतराने ती व्यक्ती तिचे काम किंवा नोकरी बदलायचा आणि काहीतरी अधिक व्यापक असे करण्याचा विचार करण्याची शक्यता असते आणि यासाठी बदलीमूल्यांसंबंधी शिकणे आवश्यक असते.

 जेव्हा एखादी व्यक्ती काम करणे थांबविते तेव्हा तिला नव्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शेवटी, व्यक्ती कितीही वरिष्ठ असो, कितीही मेहनती असो, अशी एक सायंकाळ येतेच जेव्हा लोक जमतात आणि एका छानदार समारंभात त्याला हारतुरे देतात. अलार्मचे घड्याळ भेट म्हणून देतात. त्यावर लिहिलेलं असतं, “आपलं निवृत्त जीवन आनंदाचे जावो,' आणि संघटनेसाठी त्यांनी केलेले कार्य याविषयी उद्गार काढले जातात : “तुमच्या निवृत्तीने होणारी पोकळी भरणे किती अवघड आहे," इ. इ. पण शेवटी, “चालते व्हा आणि पुन्हा इथे फिरकूही नका"—हाच कामाचा शेवट असतो. दुस-या दिवशी काय करायचं या व्यक्तीने?

 माझा एक मित्र एका फार मोठ्या संघटनेत प्रकल्प व्यवस्थापक होता. त्याला वाटलं की तो ज्या दिवशी निवृत्त होईल त्या दिवसापासून त्याचा सल्ला मागायला लोक येतील. तो निवृत्त झाला. पण दुस-या दिवशी त्याचा सल्ला घ्यायला कुणाचीही रांग लागली नव्हती. त्याने बायकोच्या कामांकडे बारकाईने पाहिलं आणि एक कृती-आलेख बनवून तिला म्हटलं, “हे बघ, एकापाठोपाठ एक कामं करून तू सकाळी खूप वेळ खर्च करतेस. जर तू ही कामे समांतर पद्धतीने केलीस तर रोज सकाळी ५० मिनिटे वाचवू शकशील." त्याची बायको मला येऊन म्हणाली, "शरू, माझ्या नव-याला घरातून बाहेर काढ. माझ्याकडे पगार निमपट आहे आणि नवरा चौपट अशी परिस्थिती झाली आहे—फार जड जातंय!"

 निवृत्तीनंतरही, म्हणजे काहीही काम नसतानाही एखाद्या व्यक्तीला त्याचा वेळ खर्च करावाच लागतो. कामावर असताना काय करायचं हे आपल्याला माहीत असतं. पण कामावर जाणं संपल्यावर काय करायचं ते ठाऊक नसतं. येथे आरामाचा आनंद घेण्याचे मूल्य समर्पक व संबंधित ठरते. शेवटी, निवृत्त होऊन निवृत्त जीवनाचा आनंद