पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१२६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४०
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
 

कर्मचा-यांबरोबर ज्या समस्या असतात त्याचीच प्रतिबिंबे असतात. जेव्हा काही व्यवस्थापकांना हव्या असतात तेव्हाच मोठ्या कामगारविषयक समस्या उद्भवतात आणि जेव्हा कंपनीतल्या नंबर दोनला (नंबर १ ला उलथवायला) समस्या हव्या असतात तेव्हा सर्वात मोठ्या कामगारविषयक समस्या उद्भवतात. ब-याच वेळा कामगारांबरोबरच्या तथाकथित समस्या त्या स्वत: व्यवस्थापकांमधल्याच ‘छुप्या युद्धा'चा प्रकार असतो. त्यामुळे व्यवस्थापनाने प्रथम जे काही करायला हवे ते म्हणजे स्वत:च्या गटात–अगदी पहिल्या स्तरावरील पर्यवेक्षकापासून ते थेट उच्च व्यवस्थापनापर्यंत-एकोपा स्थापन करणे. या गटात एकोप्याची मजबूत भावना हवी.

 दुसरी बाब म्हणजे लागेबांधे. कामगारांचे स्वाभाविकच लागेबांधे असतात. कामगार संघटनांचे राजकीय पक्षांबरोबर लागेबांधे असतात आणि त्यांच्यातर्फे खूप दडपण आणण्यात येते. ब-याच वेळा प्रसारमाध्यमेही कामगारसंघटनांना पाठिंबा द्यायला तयार असतात. आजकाल समाजात निर्माण होणारी भावना ही दोन्ही बाजूंवर दडपण येण्यातला महत्त्वाचा भाग झाली आहे. व्यवस्थापन राजकीय पक्ष, नोकरशहा, पोलीस आणि प्रसारमाध्यम यांच्याशी लागेबांधे ठेवायला आणि त्यांना शक्य तितक्या परिणामकारकरीत्या त्यांची बाजू मांडायला मोकळे असते. जेणेकरून, सरतेशेवटी, लोकांना कळून चुकते की यात दोन बाजू आहेत आणि ते व्यवस्थापनालाही पाठिंबा द्यायला तयार होतात.

 यानंतर येते शक्तिसामर्थ्याचे प्रात्यक्षिक. हे फार महत्त्वाचे असते. कामगारसंघटना उत्पादन प्रक्रिया मंद करून किंवा पूर्णपणे थांबवून त्यांचे शक्तिसामर्थ्य दर्शवायचा प्रयास करतात. व्यवस्थापनाने कामगारसंघटनेच्या या प्रयासानंतरही काही प्रमाणात उत्पादन चालू ठेवण्याचे प्रयत्न करायला हवेत. संप सुरू असताना किंवा मंद गतीने काम सुरू असताना जर व्यवस्थापन काही काळ पुरेसा उत्पादन पुरवठा टिकविण्यात यशस्वी झाले तर कामगारांचे नैतिक धैर्य खचते. येथे उग्रवादी संघटनेला माघार घ्यावी लागते.

 दुसरीकडे, जर उग्रवादी संघटना हुकूम द्यायला समर्थ असेल तर मग त्यांचे सामर्थ्य सिद्ध होते. त्यानंतर मात्र व्यवस्थापनाला कोणत्याही कारणाखाली टाळेबंदी करावी लागते; दुसरा पर्याय नसतो. अशा परिस्थितीत जर व्यवस्थापन औद्योगिक झगडा करायला तयार नसेल तर औद्योगिक शांतता संभवत नाही. संरक्षण दलांत म्हणतात त्याप्रमाणे, “आपण जर युद्धासाठी तयार असलो तरच आपण शांतता टिकवू शकतो." जेव्हा तुम्हांला उग्रवादी कामगार संघटनेला तोंड द्यावे लागते तेव्हा टाळेबंदी करायला तयार असाल, तेव्हाच तुम्हांला औद्योगिक शांतता लाभते.