पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'व्यवस्थापक (मॅनेजर)' आणि 'व्यवस्थापन (मॅनेजमेंट)' ह्या शब्दांना अचानक फार महत्त्व प्राप्त झाले आहे. माझ्या तरुणपणी (म्हणजे कालपरवापर्यंत) 'अधिकारी (ऑफीसर)' हा शब्द महत्त्वाचा वाटत होता. प्रत्येक बुद्धिमान तरुणाला अधिकारी व्हायचे होते–सरकारात, उद्योगक्षेत्रात, लष्करात किंवा निदान महापालिकेत तरी 'मॅनेजर' या शब्दाचा संबंध 'रेस्टॉरंटचा मॅनेजर' किंवा 'सर्कशीचा मॅनेजर' यांच्याशी जोडला जात होता.
 परंतु या शब्दाला आता प्रकाशवलय प्राप्त झाले आहे. प्रत्येक तरुण-तरुणीला व्यवस्थापक व्हायचे आहे; आणि आता व्यवस्थापकीय कारकिर्दीत प्रवेश करण्यासाठी प्रत्येक तरुण-तरुणी धडपडत आहे. मागे एकदा मी दिल्लीत असताना अशी अफवा ऐकली की लष्कराच्या जनरलना केवळ जनरल न म्हणता ‘जनरल मॅनेजर' म्हटले जावे!
 जरी लोक व्यवस्थापकीय क्षेत्राकडे आकृष्ट होत असले तरीही या क्षेत्रात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो याची त्यांना काही कल्पना नसते. व्यवस्थापक मंडळीला काय मिळतं हे लोकांना ठाऊक असतं; पण व्यवस्थापनातील त्यांच्या योगदानाची माहिती नसते.
 व्यवस्थापकपदावरून निवृत्त झालेल्या माझ्या अनेक व्यवस्थापक मित्रांची तक्रार असते, “निवृत्तीनंतर मी पारदर्शक झालो आहे! मी जर रेल्वेस्टेशनवर किंवा इतर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभा असेन आणि पूर्वी माझ्या हाताखाली काम केलेली व्यक्ती बाजूने जात असेल तर ती मला ‘आरपार' पाहते; मला चक्क ओळखतही नाही!" दुसरीकडे माझे काही मित्र म्हणतात, “माझ्या हाताखाली काम केलेली व्यक्ती मला पाहिल्यावर ‘सर, कसे आहात तुम्ही?' अशी विचारपूस करण्यासाठी रस्ता ओलांडून येतात.

 ज्या कुणाला व्यवस्थापकीय पद हे समाजातील स्थानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. असे वाटते त्यांना आढळतं की त्यांनी त्यांची खुर्ची सोडली की ते स्थान आणि ती