पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हिंदू समाजात चातुर्वर्ण्य संस्था अत्यंत दृढमूल झालेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण समाजात असतात अशी हिंदूंची श्रद्धा आहे. हे सर्व वर्णं जन्मसिद्ध आहेत. ब्राह्मण हा जन्मतःच ब्राह्मण, क्षत्रिय जन्मतःच क्षत्रिय असतो. त्या त्या वर्णाचे जे गुण ठरलेले आहेत ते जन्मतःच त्या वर्णात जन्मलेल्या व्यक्तीच्या ठायी असतात असा प्राचीन शास्त्रकारांनी सिद्धान्त केलेला आहे. आणि आपसात विवाह केल्यास ते जन्मसिद्ध गुण नष्ट होतील अशी कल्पना असल्यामुळे तसा विवाह हा हिंदुशास्त्रकारांनी निषिद्ध मानलेला आहे. असे असूनही असे विवाह होत राहिले. आणि या वर्णसंकरातून व इतरही अनेक कारणांनी सध्याच्या जाती, पोटजाती निर्माण झाल्या. त्या जातीही विशिष्ट गुणांनी संपन्न आहेत अशी श्रद्धा पुढे रूढ झाली आणि त्यातही आपसात विवाह करणे निषिद्ध ठरले. आणि अशा रीतीने हिंदुसमाजाची अनेक शकले होऊन त्याची संघटना मोडली.
 विशिष्ट वर्णात आणि जातीत विशिष्ट गुण असतात हा भ्रम आहे हे इतिहासाने व अलीकडे विज्ञानवेत्त्यांनी दाखवून दिले आहे. पण आपला समाज रूढी नष्ट करण्यास अजून फारसा तयार नाही. अलीकडे जाति-पोटजाती मोडल्या पाहिजेत, वर्णव्यवस्था घातक आहे, हे मत रूढ होत चालले आहे. पाश्चात्त्यांनी निर्माण केलेली भौतिकशास्त्रे, अनुवंशाचे त्यांनी केलेले संशोधन, या नव्या शास्त्रातून निर्माण झालेला व्यक्तिवाद, त्यावर आधारलेल्या लोकसत्तेच्या कल्पना यांमुळे जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या आधारावर पोसलेली जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था कोलमडून पडत असून कालांतराने तरी ती नष्ट होईल अशी आशा वाटू लागली आहे.