पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
वैयक्तिक व सामाजिक

मोठी क्रांती केली. आणि ती म्हणजे सरंजामदारीचा नाश ही होय. इस्लामी सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होताच त्या सुलतानांनी मनसबदार, तर्फदार किंवा वतनदार यांचा एक मोठा वर्ग निर्माण केला आणि गरीब रयत त्यांच्या स्वाधीन करून टाकली. हे मनसबदार म्हणजे लहान लहान राजेच असत. आणि दिवाणी, मुलकी, फौजदारी व लष्करी वगैरे सर्व अनियंत्रित अधिकार त्यांजकडे असत. त्यांना रोकड वेतन नसे, जहागिरी असत. आणि त्या त्या परगण्याचा ठराविक वसूल बादशहाकडे दिला की मग त्यांची जबाबदारी संपली, अशी व्यवस्था असे. प्रजेला त्यांनी कसे वागविले हे बादशहा कधीच पाहत नसत. याचा परिणाम काय होत असेल त्याची कल्पना करणे अवघड नाही. महसूल दहा हजार असला तरं हे मनसबदार एक लाख सहजच उकळणार. त्यांना विचारता कोणी नव्हता. पुन्हा बादशहा, जो जास्त महसूल देईल त्याला, वतन देण्याविषयी दक्ष असत. त्यामुळे रयतेला पिळून काढणे यात मनसबदारांची अहमहमिका लागत असल्यास नवल नाही. इस्लामी राज्यापूर्वी महाराष्ट्रात व भारतातही अशी रक्तपिपासू राक्षसी सुलतानी केव्हाच नव्हती. अर्थातच शेतकरी, कुणबी यांना शेत कसण्यात कसलाहि उत्साह राहिला नव्हता. त्यामुळे गावेच्या गावे ओसाड पडत, रयत परागंदा होई ! त्यात लढाया, जाळपोळ, लूट, अत्याचार हे नित्याचेच होते. त्यामुळे सर्व देश उजाड होऊन गेला होता. देशाला ही अवकळा मुसलमानी राज्यामुळे आली हे खरे पण अनेक वतनदार हिंदू होते, मराठे होते. त्यांची रीत कोणत्याही प्रकारे निराळी नव्हती. त्यामुळे रयतेला सर्व सारखेच झाले होते. आपल्या राज्यात काही निराळे होईल ही आशा करण्यास तिला जागाच नव्हती. मग तिने हिंदवी स्वराज्यासाठी का झटावे ? अशा रीतीने जनता ही महाशक्तिच स्वातंत्र्याविषयी उदासीन होती. मग इस्लामी सत्तेला विरोध करावयाचा कोणी आणि का ?
 छत्रपतींनी याचे उत्तर दिले यातच त्यांची असामान्यता, त्यांचा समाजव्यापी आलोक, त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. त्यांनी मध्यस्थ असलेली ही वतनदारी सफाई नष्ट केली आणि राजसत्ता व प्रत्यक्ष जमीन कसणारा शेतकरी, कष्ट करणारी रयत यांचा संबंध जोडला आणि हिंदवी स्वराज्यासाठी ही महाशक्ती प्रसन्न करून घेतली. शिवछत्रपतींचे गुरुजी दादोजी कोंडदेव यांनी