पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

'गोरगरीब, अनाथ यांचा अभिमान धरावा,' 'हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी' हा संदेश त्यांना दिला. त्याबरोबर हे लोक आक्रमकाशी प्रणपणाने झुंजू लागले. मोठमोठ्या मोहिमा यशस्वी करू लागले, गड-किल्ले घेऊ लागले, आरमार बांधू लागले, शत्रूंच्या फौजांची लांडगेतोड करू लागले, त्याचा मुलूख उद्ध्वस्त करू लागले, आणि दिल्ली हस्तगत करण्याची स्वप्ने पाहू लागले. मुसलमानांच्या फौजेपुढे हिंदू जसे पूर्वी हाय खात तसे आता मुसलमान मराठ्यांपुढे हाय खाऊ लागले. कोप्पल ताब्यात घेण्यासाठी हुसेन मियाना याशी हंबीररावाची लढाई झाली. त्या वेळी 'हंबीररावाने हत्यार चालविताच शेकडो मनुष्य जाता येता मारले, खान नामोहरम होऊन पळू लागले, त्यास धरून आणले, मग चहूकडून लांडगेतोड करून बेजार केले. त्यामुळे 'पुनः मराठ्यांच्या लढाईची गाठ ईश्वरा घालू नको' असेच ते लोक म्हणू लागले. खासा औरंगजेब दक्षिणेत सर्व सरंजामानिशी, सर्व इस्लामी सामर्थ्य पणास लावून, २५ वर्षे मराठ्यांना चिरडून टाकण्याची कसम खाऊन महाराष्ट्रात उतरला होता. कनोज, नगरकोट, सोमनाथ येथल्या पूर्वीच्या लढायात एकेका दिवसात अफाट हिंदू फौजांना आक्रमकांनी धुळीस मिळविल्याचे आपण वाचतो. सिंधू, मुलतान, गुजराथ, बंगाल, बिहार हे प्रांत एकदोन महिन्यांच्या अवधीत, काहीतर दोनचार दिवसात म्लेंछांनी कब्ज केले. मलिक काफुराने सगळी दक्षिण दहाबारा वर्षात धुळीस मिळविली. आणि आता ? पंचवीस वर्षे सर्व सेनापती, सर्व फौज, सर्व सल्तनत घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात राहिला होता. पण मराठ्यांनी हा सर्व सरंजाम दस्त केला, गारद केला, धुळीस मिळविला. या वेळी त्यांना राजा नव्हता, सेनापति नव्हता, नेता नव्हता. पण त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या चित्तात छत्रपति होते. नवा धर्म होता. हे लोक राजकारणाविषयी उदासीन असते तर दोनचार महिन्यात, फारतर दोनचार वर्षात महाराष्ट्र पडला असता. तसे तर झाले नाहीच, उलट याच मराठ्यांनी मोगली सत्तेची पाळेमुळे भारतातून थोड्याच अवधीत खणून काढली. छत्रपतींनी जी धर्मक्रांती घडविली, राजकारणामागे जी धर्मशक्ति उभी केली, समाजाचे सर्व थर हलवून तेथून कर्तृत्व निर्माण करून जी सामाजिक क्रांति केली, तिची ही फळे आहेत.
 पण जनशक्ती आपल्या पाठीशी उभी करण्यासाठी, अखिल महाराष्ट्रसमाज स्वराज्यवादी, स्वातंत्र्योन्मुख करण्यासाठी छत्रपतींनी आणखी एक फार