पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
वैयक्तिक व सामाजिक

('अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ'- श्रीधरशास्त्री पाठक, 'मध्ययुगीन भारत, ३ रा खंड'- चि. वि. वैद्य, 'स्पर्शास्पर्श'- पं. सातवळेकर). समाजात आपल्या उन्नतीला अवसर नाही असे ज्या जमातीला वाटते ती राष्ट्रीय प्रपंचाविपयी उदासीन होणारच. चांडाळ स्त्रीपासून झालेला पराशर, कोळणीपासून झालेला व्यास, गणिकेपासून झालेला वसिष्ठ हे सर्व मागल्या काळात उच्चपदाला जाऊ शकत होते. तसा त्या वेळी धर्म होता. तसे शास्त्र होते. म्हणूनच समाजहिताविषयी त्या जमाती त्या काळी उदासीन नसत. स्त्रियांच्याविषयी हाच विचार ध्यानी घेतला पाहिजे. बालविवाहाने आणि विधवाविवाह-निषेधाने स्त्रीला या अदृष्ट फलधर्माने प्रपंचातून उठविल्यासारखेच केले. स्वतःचे जीवनच जिला भारभूत झाले ती समाजहितचिंतन काय करणार ? अशा रीतीने शास्त्री पंडितांनी जो अमंगल कर्मकांडात्मक, जड, अंध, अज्ञानात्मक धर्म भारतात प्रसृत केला त्यामुळे बहुसंख्य समाज राजकारण, सामाजिक प्रपंच, त्याचा उत्कर्षापकर्ष याविषयी पराकाष्ठेचा उदासीन आणि म्हणून कर्तृत्वशून्य झाला. याला जागृत केल्यावाचून कोणत्याहि परकी आक्रमणास तोंड देण्यास, ते मोडून काढण्यास हा हिंदुसमाज समर्थ झाला नसता.
 श्रीशिवछत्रपतींनी नेमके हेच जाणले आणि 'मराठा तेवढा मेळवावा,' सर्व समाज हिंदवी स्वराज्याच्या आकांक्षेने चेतवून द्यावा, ती महान् शक्ती आपल्या पाठीशी उभी करावी, यासाठी प्रयत्नाची शर्थ केली. याविषयी प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावे थोडे उपलब्ध आहेत. पण त्यांची मुळीच जरूर नाही. छत्रपतींच्या भोवती उदयास आलेल्या कर्त्या माणसांची नुसती नावे पाहिली तर क्रांतीमुळे नव्या सामाजिक थरातून, आजपर्यंत ओसाड पडलेल्या जमिनीतून, नवीन कर्तृत्व कसे उदयास येते हे सहज कळून येईल. जेधे, मालुसरे, पालकर, कंक, नरसाळा, पानसंबळ, डबीर, कोरडे, हणमंते, गुजर, मोहिते पिंगळे, रांझेकर, लोहकरे, काकडे, नाईक, चिटणीस, प्रभु, भंडारी अशी कर्त्या पुरुषांची घराणीच्या घराणी आपल्याला त्या काळी राजकारणोन्मुख झालेली दिसतात. हे लोक पूर्वी वतनासाठी भांडत बसले होते, शेती करून गुजारा करीत होते, पातशाही नोकरी करून पोट जाळीत होते. ते राष्ट्रीय प्रपंचाविषयी सर्वस्वी उदासीन होते. छत्रपतींनी त्यांना धर्माचा नवा अर्थ सांगितला. 'यवन, दुष्ट तुरुक याचे कृत्यास अनुकूल होणे हा अधर्म होय,' 'धर्मरक्षणार्थ प्राणही अर्पावा,'