पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

निर्माण केल्यावर समाजाचे काय होईल, त्याला किती दौर्बल्य येईल हे सांगावयास पाहिजे असे नाही. या भाष्यकारांच्या जोडीला दहाव्या-अकराव्या शतकापासून संतमंडळ आले आणि, मोक्षासाठी संसार सोडण्याची जरूर नाही असे म्हणत असताहि त्या संसाराची, स्त्री-पुत्र, धनवैभव, राज्य, साम्राज्य यांची इतकी हिडीस, ओंगळ चित्रे त्यांनी रंगविली, त्या संसाराविषयी उत्साह दाखविणांऱ्यांची इतकी निर्भर्त्सना केली की आचार्यांच्या संस्कृत ग्रंथांनी च प्रवचनांनी कर्तृत्वनाशाचे प्रारंभिलेले कार्य यांनी प्रांतिक भाषात ग्रंथ लिहून पुरे करून टाकले. शतकानुशतक समाजाला निवृत्तीचे, संन्यासधर्माचे, संसारनिंदेचे असे अखंड पाठ मिळत राहिल्यामुळे, स्वराज्य, साम्राज्य, समाजसंघटना, व्यापार, विद्येची, विज्ञानाची उपासना, जगप्रवास, याविषयीची भारतीयांच्या मनातली उभारीच नष्ट झाली. अशा स्थितीत परकी आक्रमणाला ते बळी पडत राहिले तर नवल काय ?
 ज्या धर्माला निवृत्तिप्रधान रूप येते तो धर्म समाजसंघटनेचे तत्त्व म्हणून उपयोगी पडू शकत नाही हे उघडच आहे. इस्लामी धर्म जसा अत्यंत प्रवृत्तिपर होता तसाच संघटकही होता. प्रारंभीची अनेक शतके तरी इस्लामी शिपाई परधर्मीयांच्या बाजूने दुसऱ्या इस्लामी शिपायाशी लढणार नाही एवढी धर्मनिष्ठा मुसलमानात जाज्वल्य स्वरूपात दिसून येत होती. सिंधच्या दाहीर राजाचा आरब सरदार आलाफी हा महंमद कासिमविरुद्ध लढला नाही. पण मोक्वा वसैया या हिंदूजवळ मात्र ही निष्ठा नव्हती. त्याने हिंदु राजा दाहीर याच्याविरुद्ध जाऊन महंमदाला होड्या, वाटाड्ये, इ. सर्व प्रकारचे साह्य केले. भारताचा पुढील इतिहास असल्याच उदाहरणांनी भरलेला आहे. (आणि आजही तो रिकामा झालेला नाही !) राष्ट्रनिष्ठा त्या काळात उदयास आली नव्हती. पण धर्मप्रेम हे तर लोकांच्या ठायी जगातल्या प्रत्येक देशात जागृत होते. त्याचा संघटनेसाठी उपयोग करून ज्यांनी समाजात ऐक्यभाव व कडवा आपपरभाव निर्माण केला त्यांना पराक्रम करता आला. हिंदूंमधल्या तत्त्ववेत्त्यांनी धर्माचा या दृष्टीने कधी विचारही केला नाही. आणि समाजसंघटनेचे दुसरेही कोणते तत्त्व निर्माण केले नाही. जेथले तत्त्ववेत्ते, म्हणजेच धर्मवेत्ते इतके दरिद्री, दृष्टिशून्य व कर्तृत्वहीन झाले तेथला समाज