पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
वैयक्तिक व सामाजिक

१९३०, ३१ साली वुद्धिजीवी लोकांची स्टॅलिनने कशी कत्तल केली ते सर्वश्रुतच आहे. पुढे सामूहिक शेतीच्या जमान्यात शेतकऱ्यांचे त्याने असेच हत्याकांड केले. चीनमध्ये माओच्या हाती सत्ता येताच प्रारंभीच्या वर्षांत अशी अनेक हत्याकांडे झाल्याच्या वार्ता ताज्याच आहेत.

 या अनर्थाला स्टॅलिन, क्रुश्चेव्ह किंवा माओ हे जबाबदार आहेत, मार्क्सवादाशी यांचा काही संबंध नाही, असे कोणी म्हणतात, ते खरे नाही. मार्क्सचे तत्त्वज्ञानच या घोर अनर्थाला कारण झालेले आहे. व्यक्तित्व, मानवत्व हे अंतिम मूल्य त्यानेच नष्ट केले आहे. भिन्न आर्थिक परिस्थितीतल्या भिन्न वर्गांचे विशिष्ट गुण असावयाचे असे ठरवून त्यांच्याविषयी अत्यंत विपरीत, अविवेकी व इतिहासशून्य असे सिद्धान्त मार्क्सने सांगून ठेवले. आणि त्याच्या जोडीला अत्यंत क्रूर व असहिष्णु अशी वृत्ती त्यानेच निर्माण करून ठेविली. धर्माला अवकळा आल्यानंतर तो जसा असहिष्णु, क्रूर, अंध बनतो तसा मार्क्सवाद मुळातच आहे. विरोधी पक्षांची वैरे मृत्यूनेच संपावयाची, क्रांती ही रक्तपातानेच व्हावयाची हे त्याचे तत्त्वज्ञान आहे. समन्वय, सलोखा, औदार्य, दिलदारी, सहिष्णुता हे मानवी संस्कृतीने वाढवीत आणलेले सद्गुण मार्क्सवादाने निर्दाळून टाकले आहेत आणि मानवाला पुन्हा एकदा कळपसंस्कृतीकडे नेण्याचा मार्ग आखला आहे.
 मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्याचा हा असा अर्थ किंवा अनर्थ आहे. आपल्याला लोकशाही निष्ठांची जोपासना करावयाची असेल तर जुन्या चातुर्वर्ण्या- प्रमाणेच हे नवे चातुर्वर्ण्यही आपण समूळ उच्छिन्न करून टाकले पाहिजे. तसे केले नाही तर भारतात लोकसत्ता यशस्वी करण्याची आशा कधीच धरता येणार नाही.