पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
वैयक्तिक व सामाजिक

तेथे गुंततो. आणि तेवढ्या प्रमाणांत तो क्रांतिविरोधी, प्रतिगामी वृत्तीचा असतो. जमीन नसलेला पण खेड्यात शेतीवर मोलाने राबणारा शेतमजूर हा कामगारासारखाच पूर्ण अकिंचन असतो. त्यामुळे तो मार्क्सच्या मते कामगारांचा खरा विश्वासार्ह मित्र. पण तो कामगारांसारखा स्वयंसिद्ध क्रांतिकारक मात्र नव्हे. कारण तो खेड्यांत रहातो. त्यामुळे दहा ठिकाणी विखुरलेला, पांगलेला असा असल्यामुळे तो संघटित होऊ शकत नाही. गिरण्या- कारखान्यात कामगार रात्रंदिवस एकठाय येत असल्यामुळे त्यांची संघटना करणे सहज शक्य असते. पण हा गौणभाग होय. गमविण्याजोगे काही नाही, 'स्व' कशातच नाही, हा प्रधान गुण होय. यात पहिला क्रम कामगाराचा असल्यामुळे तो खरा क्रान्तिकारक होय. बाकीचे या स्थितीच्या जवळ ज्या प्रमाणात येतील त्या प्रमाणात ते कामगाराचे मित्र व क्रांतिकारक असे मार्क्सचें तत्त्वज्ञान आहे. (१-५८३-५८५)
 मार्क्सचे व आज शंभर वर्षांनंतरही त्याच्या या सिद्धान्ताचा पाठपुरावा करणाऱ्या त्याच्या अनुयायांचे मानवी स्वभावाचे अज्ञान या विचारसरणीतून अगदी स्पष्ट होते. या अज्ञानामुळेच त्यांनी मानवाला एका आर्थिक साच्यात दडपून बसविण्याचा अट्टाहास चालविला आहे आणि त्यामुळे पदोपदी मार्क्सवाद अपयशी होत आहे. काही गमविण्याजोगे नाही म्हणून माणूस क्रांतीला सिद्ध होईल ही मोठी अजब मीमांसा आहे. आणि ती क्षणभर खरी धरली तरी गमविण्याजोगे काही आहे, जिंदगी आहे, जमीन आहे, तिला धोका आहे हे दिसताच माणूस तितक्याच त्वेषाने उसळून उठतो एवढे तरी मार्क्सवादाला कळावयास हवें. इतिहासाने हे अनेक वेळा सिद्ध करून दिले आहे. कुल, वंश, धर्म, राष्ट्र, या निष्ठांसाठीही माणसे सर्वस्व त्यागास तयार झालेली आहेत. याचा अर्थाशी, धनाशी काहीही संबंध नाही. पण नाही कसा ? मार्क्समताने त्याचा घनसंबंध आहे. धननिर्मितीच्या साधनांतूनच समाजाच्या निष्ठा जन्म पावत असतात. आणि त्या साधनाचे स्वामी जे जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार तेच कामगारांना भुलविण्यासाठी धर्म, वंश, राष्ट्र या निष्ठांचा प्रचार करीत असतात. कामगारांचा विशेष गुण हा की तो एकदा वर्गजागृत झाला की यातल्या कोणाच्याही निष्ठा तो मानीत नाही.