पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

कामगारांनी अवसर सापडताच नेतृत्व करून दाखविलेच आहे. आणि भारतीय कामगारांनाही ते पुढे शक्य होईल यात शंका नाही.
 असो. मार्क्सच्या सिद्धान्ताचा ऐतिहासिक दृष्टीने येथवर विचार केला. आता थोडी तत्वचिकित्सा करू.
 भांडवलदार, व्यापारी, बुद्धिजीवी, जमीनदार, शेतकरी, शेतमजूर, कामगार या सर्व वर्गातून कामगार हेच फक्त खरे क्रांतिकारक, तेच क्रांतीचे नेते असे मार्क्स का म्हणाला ? इतर वर्गांच्या अंगी कोणचे अवगुण त्याला दिसले ? कामगारांच्या अंगी कोणचे विशेष गुण दिसले ?
 समाजातील अर्थनिर्मितीची साधने हीच समाजाच्या संस्कृतीची निर्णायक असतात हा मार्क्सवादाचा जो पायाभूत सिद्धान्त तोच या कल्पनेच्या बुडाशी आहे. कामगारांच्या जवळ कोणच्याही प्रकारचे धन नसते. जमीन, नांगर, कुऱ्हाड, पटाशी, रांधा, चाक, इंजिने, यंत्रे यांपैकी एकाही धननिर्मितीच्या साधनांवर त्याची मालकी नसते, तो सर्वस्वी धनहीन असतो, हाच मार्क्सच्या दृष्टीने त्याचा सर्वात मोठा गुण होय. जगातील कामगारांना संघटनेचा त्याने जो संदेश दिला आहे त्यात त्यांच्या त्याच गुणाचा त्याने निर्देश केला आहे. 'या लढ्यात तुम्हाला काही गमवावे लागणार नाही. कारण दास्याच्या श्रृंखलांखेरीज गमावण्याजोगे तुमच्याजवळ काहीच नाही.' यातील तत्त्वज्ञान असे : इतर वर्गाचे काही ना काही तरी हितसंबंध प्रस्थापित राज्यात, शासनात गुंतलेले असतात. आहे ही व्यवस्था उलथून पाडली तर आपल्या त्या हिताला बाधा येईल अशी भीति या वर्गांना वाटत असते. म्हणून ते नेहमी प्रस्थापित राज्याचाच पक्ष घेतात. भांडवलदार, जमीनदार, व्यापारी हे क्रान्तिविरोधी असतात याचे कारण हेच. सरकार त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करीत असते. ते सत्ताच्युत झाले तर आपली सर्व जिंदगी जाईल हा धसका त्यांच्या मनात असतो. कामगारांना ही भीती नसते; कारण त्यांना जिंदगीच नसते. मार्क्सने त्यांना जिंदगीहीनांचा राजा म्हटले आहे. आणि जिंदगीच्या कमीजास्त प्रमाणावरच त्याने क्रांतिकारकत्वाची प्रतवारी लावली आहे. भांडवलदार, जमीनदार, हे क्रांतीचे कट्टे वैरी. पूर्ण प्रतिगामी. बुद्धिजीवी हे बहुधा त्यांचे गुलाम. शेतकरी हा गरीब असतो पण जमिनीचा तो मालक असतो. एखाद्या तुकड्यावर तरी त्याचे स्वामित्व असते. म्हणून त्याचा जीव