पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
वैयक्तिक व सामाजिक

आहेत, पण तो त्यांचा भ्रम आहे. चातुर्वर्ण्य या शब्दाचा मोह जसा भारतीय नेत्यांना कधी टाकता येणार नाही त्याचप्रमाणे मार्क्सवाद या शब्दाचा मोह चिनी कम्युनिस्टांना टाकता येणार नाही, असे वाटते. वास्तविक मार्क्सची आंतरराष्ट्रीय दृष्टी त्यांनी प्रारंभापासूनच सोडून देऊन राष्ट्रनिष्ठेला प्राधान्य दिले, कामगारांच्या नेतृत्वाचा छंद थोड्याशा प्रयोगानंतर सोडून दिला आणि पुनर्घटनेला लागल्यानंतर वर्गविग्रहाचे मार्क्सचे अत्यंत प्रिय तत्त्व दूर ठेविले. असे असूनही आपण मार्क्सवादी आहोत असा उद्घोष ते करीत असतात. तेव्हा त्यांचे कामगारांचे नेतृत्वही याच जातीचे असले पाहिजे हे उघड आहे.
 हिंदुस्थानात कामगारांचे क्रान्तिकारकत्व कितपत अनुभवास आले हे जगजाहीर आहे. रशिया, चीन, युगोस्लाव्हिया येथे कामगारांनी नेतृत्व केले नसले तरी निदान क्रान्तीत त्यांनी बहुसंख्येने भाग तरी घेतला होता. हिंदुस्थानात क्रान्तीला विरोध हेच कामगार संघटनेचे लक्षण होऊन वसले होते. ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या एकाही लढ्यांत कामगारांनी भाग घेतला नाही. आणि १९४२ च्या लढ्यात तर ब्रिटिशांशी सहकार्य करण्यातच त्यांनी भूषण मानले. येथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामुळे असे झाले असे कोणी म्हणतात. मलाही ते मान्य आहे. पण याचाच अर्थ असा की कामगार नेतृत्व करू शकत नाहीत. रशियन कम्युनिस्ट पक्षाने साम्राज्यशाही आरंभिली, तिला तेथल्या कामगारांनी साथ दिली. चिनी कम्युनिस्टांनी वर सांगितल्याप्रमाणे मार्क्सवादाचा त्याग करून राष्ट्राची पुनर्घटना केली तेव्हाही त्यांनी सांगितले ते सहकार्य कामगारांनी केले आणि हिंदी कम्युनिस्टांनी राष्ट्रीय लढ्याला विरोध करून ब्रिटिश साम्राज्यशाहीशी सहकार्य करण्याची त्यांना शिकवण दिली. तेव्हा त्याही मार्गाला ते गेले. कामगार ही शेतकऱ्यासारखीच एक प्रचंड शक्ती आहे. या शक्ती जागृत झाल्या की कोणचेही क्रांतिकार्य सिद्धीला जाते. या शक्तीच्या साह्यावाचून क्रांती यशस्वी होणे शक्य नाही. पण किसानकामगार ज्या परिस्थितीत काम करीत असतात ती परिस्थितीच अशी आहे की नेतृत्वाला लागणाऱ्या गुणसंपदेची जोपासना त्यांना करता येत नाही. लेनिन हा कामगारांचा कट्टा अभिमानी असूनही त्याने हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. अर्थात् त्यालाही तात्त्विक दृष्टीने अर्थ नाही. कारण अमेरिकन व ब्रिटिश