पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९९
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

गारांनी क्रांतीचे नेतृत्व कितपत केले, बुद्धिजीवी वर्गाचे गुण कोणचे ह्याचाहि विचार केला. आता चिनी क्रांतीचा इतिहास काय सांगतो ते पाहूं.
 चिनी क्रांती ही चिनी शेतकऱ्यांनी केलेली आहे. चीनमधल्या कामगारवर्गाचा तिच्याशी फार थोडा संबंध आहे. कामगारांच्याकडे तिचे नेतृत्व कधीच नव्हते. तेथील कम्युनिस्टांनी निर्माण केलेल्या लाल सेनेशी काही बाबतीत सहकार्य करून तिला साह्य करणे येवढेच तेथल्या कामगारांचे क्रांतिकार्य ! प्रारंभी माओ, चुतेह, लिलिसान इ. नेत्यांनी मार्क्सवादाच्या पढिक ज्ञानामुळे कामगार संघटनांवर भर दिला होता. पण यात कांही अर्थ नाही हे लवकरच त्यांच्या ध्यानी आले आणि त्यांनी आपले सर्व लक्ष ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांवर केंद्रित केले. त्यांची आठवी सेना ही शेतकऱ्यात जागृति निर्माण करणारी एक फार मोठी किसानसंघटना होती. तिने सर्व चीन जागृत केला आणि या जागृत किसानांच्या साह्यानेच कम्युनिस्ट पक्षाने चीनमध्ये क्रांती यशस्वी केली. आज चीनचे नेते इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे 'कामगारच येथल्या क्रांतीचे यशस्वी नेते आहेत,' अशी भाषणे करीत आहेत. पण त्यांच्या चळवळीचा इतिहास व त्यांची पूर्वीची भाषणे ही याच्या सर्वस्वी विरुद्ध आहेत. आज ते तशी भाषणे करीत असले तर सत्य लपवून दुसरे काही साधण्याचा त्यांचा हेतू असला पाहिजे. किंवा आम्ही मार्क्सवादीच आहोत हा भ्रम सोडणे त्यांना कठीण जात असले पाहिजे. ते काहीही असले तरी चीनच्या क्रांतीच्या नेतृत्वाशी तेथल्या कामगारवर्गाचा कसलाही संबंध नव्हता हे ऐतिहासिक सत्य आहे. चीनची क्रांती शेतकऱ्यांनी केली आहे. जमिनीच्या आसक्तीमुळे त्यांच्यात क्रांतिकारकत्व असणे शक्य नाही असे मार्क्स म्हणाला होता. याच श्रद्धेमुळे लेनिनने ज्यांच्यांत जागृती करण्याचा प्रारंभी फारसा प्रयत्न केला नाही, (४.४५४,५५), देशभर विखुरलेले असल्यामुळे ज्यांच्यात संघटना करणे अवघड आहे असे मार्क्सने सांगून ठेविले होते, शेतात काम करतांना तो श्रमजीवी असतो पण धान्य विकताना तो 'पेटी बूर्झ्वा' होतो आणि अशा द्विधा वृत्तीमुळे तो क्रांतीला नकळत विरोध करतो, असे ज्या शेतकऱ्याबद्दल लेनिन म्हणाला होता, (४.४७९), त्याच शेतकऱ्यांनी चीनमध्ये क्रान्ती घडवून आणली. आमची क्रान्ती आम्ही मार्क्स- लेनिन- स्टॅलिन यांच्या तत्त्वाअन्वये घडविली असे चीनचे नेते आज म्हणत