पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
वैयक्तिक व सामाजिक

दिसतेच आहे. रशियन कामगार व तेथील एकंदर जनता सध्या किती दीन, किती पराधीन, किती व्यक्तित्वशून्य आहे हे स्टॅलिनच्या मरणानंतर फारच स्पष्टपणे दिसून आले. स्टॅलिन हा कामगारांचा परमेश्वर होता. अनन्यभावाने ते त्याला भजत होते. त्याची स्तोत्रे गात होते. त्या स्टॅलिनवर क्रुश्चेव्हने चोर, बदमाष, डाकू, दरवडेखोर, खुनी, यांच्यावर करावे तसे आरोप केले. त्याचे पुतळे हलविले, प्रतिमा नष्ट केल्या आणि त्याचे नावहि वृत्तपत्रांतून नष्ट करून कामगारांच्या या परमेश्वराला त्याने गटारात फेकून दिले. पण सर्व रशियात या परमेश्वराचा कैपक्ष घेऊन उठण्याचे, त्याच्या बाजूने एक शब्द उच्चारण्याचे धैर्य एकाही कामगाराने दाखविले नाही. कामगारांचा कणखरपणा, त्यांचे असामान्य सामर्थ्य, त्यांची प्रतिकारशक्ती ती हीच काय ? झारशाही उलथून पाडण्याचे श्रेय घेणाऱ्या रशियन कामगारांच्या नेतृत्वानेच हे सर्व चालले आहे ना ?
 वास्तविक रशियन कामगारांचा यात फारसा दोष नाही. पिढ्यान् पिढ्या ते झारशाहीच्या जुलमाखाली होते. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी १९१७ साली संग्राम केला व त्यात यश मिळवले हेच विशेष होय. पण त्यांचे नेते मार्क्सवादी होते हे त्यांचे दुर्दैव होय. सर्वथा अशास्त्रीय व भ्रांतिष्ट अशा आर्थिक तत्त्वांचा अवलंब त्यांनी केला आणि त्यामुळे आज रशियात कामगारांची दयनीय अशी अवस्था झाली आहे. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांच्या मार्क्सप्रणीत अत्यंत विकृत कल्पना इंग्लिश, अमेरिकन कामगारांनी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे रशियन कामगारांपेक्षा ते कितीतरी बलिष्ठ, स्वतंत्र व सुखी आहेत. व्यक्तित्वाची ती रग रशियन कामगारात कधीच निर्माण झाली नाही. ती निर्माण होण्यास दीर्घकाळ लागत असतो. पण माणसाच्या आर्थिक स्थितीवरच त्याची संस्कृती अवलंबून असते आणि ती अगदी हिशेबाने असते असल्या विकृत तत्त्वज्ञानाचा रशियन नेत्यांनी स्वीकार केला आणि त्यामुळे आज रशियन कामगार हा नेता तर नव्हेच पण त्याच्याच नावाने सत्ता चालविणाऱ्या दण्डशहांचा दास होऊन बसला आहे.
 येथवर पश्चिम युरोपांतील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे देश आणि रशिया यांच्या इतिहासावरून मार्क्सच्या वर्गपुराणाचे परीक्षण आपण केले. काम-