पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
वैयक्तिक व सामाजिक

पाहिजे. इतके सर्व गुण ज्यांच्या ठायी आहेत त्यांनाच नेतृत्व करता येते. समाज त्यांच्याच मागे जातो.
 आता प्रश्न असा की हे नेतृत्व कामगारांना करता येईल काय ? साडेतीन हातांच्या देहाखेरीज कसलीही जिंदगी ज्याच्याजवळ नाही, कसलेहि शैक्षणिक धन ज्याच्याजवळ नाही (तसे असले तर तो कामगार राहणारच नाही, तो कसलीतरी जिंदगी प्राप्त करून घेईलच) त्या कामगाराला जुने तत्त्वज्ञान काय, नवे काय असावयास पाहिजे याचे ज्ञान होणे शक्य आहे काय ? लेनिननेच सांगितले आहे की ते शक्य नाही. 'व्हॉट इज टु बी डन् ?' या आपल्या प्रसिद्ध लेखात त्याने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, कामगारांना स्वतः नेतृत्व कधीही करता येणार नाही. ते इतर बुद्धिजीवी वर्गांकडून आले पाहिजे. कामगार फारतर कमी तास, वेतनवाढ एवढ्यापुरत्या संघटना स्वतःहून करू शकतील. यापलीकडे त्यांची मजल जाणे शक्य नाही. नवतत्त्वज्ञान निर्माण करण्यास इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान यांचे सम्यक् आकलन होणे अवश्य आहे. हे तत्त्वज्ञान सुशिक्षित धनसंपन्न वर्गातूनच निर्माण होणे शक्य आहे. मार्क्स, एंगल्स हे स्वतः धनिक बुद्धिजीवी वर्गातलेच होते हे लेनिनने मुद्दाम येथे निदर्शनास आणून दिले आहे. रशियातही याच वर्गाने प्रथम समाजवादाचे तत्त्वज्ञान सिद्ध केले आणि नंतर कामगारवर्गात प्रसृत केले (३.१२६). कामगारांना या तत्त्वाची शिकवण देताना ओढवणाऱ्या आपत्तींना लेनिन, स्टॅलिन, ट्रॉट्स्की, झिनेव्हिफ्, रॅडेक् इ. नेते डरले नाहीत. तळहाती शिर घेऊनच त्यांनी ही आग रशियाभर पसरून दिली. आणि म्हणूनच ते नेते ठरले.
 नेतृत्व याचा अर्थ असा आहे. लेनिननेच तो स्पष्ट केला आहे. आणि जगातल्या प्रत्येक देशात इतिहासाने तो दाखवून दिला आहे. ज्ञानसंपन्नता हा नेतृत्वाचा पहिला गुण आहे. हे ज्ञानधन कामगारांच्या जवळ मुळीच नसते, आणि सध्याच्या स्थितीत ते असणेही शक्य नाही. चीनच्या क्रांतीचे नेतृत्व करणारे सर्व लोक पाश्चात्त्यविद्याविभूषीत होते. त्यातले बहुसंख्य लोक पाश्चात्त्य विद्यापीठाचे पदवीधर होते. तुर्कस्थान, अरबस्थान, हिंदुस्थान, जपान, इंडोनेशिया यांपैकी प्रत्येक देशाच्या नेतृत्वाचा हाच इतिहास आहे. आणि नेतृत्वाचा जो अर्थ वर दिला आहे त्यावरून दुसरे काही असणे शक्य नाही हे सहज ध्यानात येईल. लेनिनचे जे पंधरा-वीस निकटचे सहकारी होते