पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

नामशेषच झाला. कामगारांच्या नेतृत्वाची ससेहोलपट झाली. तेथे दहा दहा लाखांच्या कामगारांच्या संघटना आहेत. पण त्यांनी मार्क्सवादाचा कधीही स्वीकार केला नाही. आणि भांडवलशाहीला मार्क्सच्या दृष्टीने पाहता, त्यांनी कसलाच धक्का दिलेला नाही. फ्रान्समध्ये प्रकार थोडा निराळा आहे. पण तो जास्त लाजिरवाणा आहे. फ्रान्समध्ये बलिष्ठ व प्रभावी असा कामगारांचा पक्षच कधी निर्माण होऊ शकला नाही. दुफळी, फाटाफूट, यादवी यांनी हा पक्ष नेहमी चिरफळलेला व म्हणून बलहीन व निस्तेज असा असतो. जगातल्या सर्व कामगारांची आर्थिक स्थिती सारखी, दुःखे सारखी, त्यांचे कार्य एक, ध्येय एक; म्हणून त्यांची एकी होणारच असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. फ्रान्सच्या लहानशा परिसरातसुद्धा तो खरा ठरत नाही. कारण तो मुळातच भ्रामक आहे.
 रशियात १९१७ साली क्रांती झाली. त्या आधी १९०५ साली अशीच जोराची उठावणी झाली होती. या दोन्ही उत्थापनांत शहरातील कामगारवर्गच प्रामुख्याने दिसत होता हे खरे आहे. लक्षावधि कामगारांनी या वेळी संप केले. सरकारी यंत्रणा ढिली केली आणि शेवटी ही चळवळ वाढत जाऊन तीतच झारशाहीचा बळी पडला. हे सर्व खरे आहे. पण याला कामगारांचे नेतृत्व म्हणावयाचे ते कोणत्या अर्थाने ? नेतृत्व म्हणजे काय ?
 नेतृत्वाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जुन्या समाजाची रचना कोणच्या तत्त्वावर झाली आहे, कोणची धर्मतत्त्वे, अर्थतत्त्वे, वंशतत्त्वे राजकीय तत्त्वे तिच्या बुडाशी आहेत, ती तत्त्वे समाजाच्या उत्कर्षाच्या आड का येतात, दुसऱ्या कोणच्या तत्त्वाअन्वये समाजरचना करणे अवश्य आहे, तशी समाजरचना इतिहासात केली असल्यास तिला कितपत यश आले, आले नसल्यास का आले नाही, इत्यादि समाजशास्त्रातील मूलमहातत्त्वांचा अत्यंत सखोल अभ्यास करून नवसमाजनिर्मितीचे तत्त्वज्ञान सिद्ध करणे हे नेतृत्वाचे पहिले कार्य आहे. आणि त्यानंतर हे तत्त्वज्ञान निर्भयपणे समाजाला शिकविणे, त्यासाठी व्याख्याने देणे, ग्रंथ लिहिणे, संस्था स्थापणे, वृत्तपत्रे चालविणे हे दुसरे कार्य आहे. हे करीत असताना सत्ताधाऱ्यांचा रोष अर्थातच होणार. तेव्हा त्यामुळे ओढवणाऱ्या सर्व आपत्तींना- तुरुंग, हद्दपारी, फाशी, संसाराचा उच्छेद- या सर्व आपत्तींना तोंड देण्याचे धैर्य या नेत्यांच्या ठायी असले