पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
वैयक्तिक व सामाजिक

झालेल्या दुसऱ्या महायुद्धातही या क्रांतीच्या नेत्यांचा कोठे पत्ता लागला नाही.
 मध्यंतरी पंचवीस वर्षांच्या काळात कम्युनिस्ट पक्ष पुन्हा सगळ्या देशात स्थापन झाले होते. रशियन क्रांतीचे यश त्यांना प्रेरणा देत होते. थर्ड इंटरनॅशनल स्थापन होऊन तिचे जाळे सर्वत्र विणले गेले होते. नेते आता जास्त अनुभवी व मुरब्बी झाले होते. पण इटली व जर्मनी या देशात सर्व कामगार ८। १० वर्षांतच फॅसिस्ट झाले. मार्क्सने कामगारांचे एक वैशिष्ट्य असे सांगितले आहे की, ते क्रांती करतात ती केवळ स्वतःसाठी करीत नाहीत. साम्राज्यशाहीच्या, भांडवलशाहीच्या गुलामगिरीतून सर्व समाज मुक्त करणे हे त्यांचे ध्येय आहे. इतर वर्ग केव्हा केव्हा क्रांतीत सामील होतात. पण ते केवळ स्वार्थी दृष्टीने. स्वतःच्या वर्गाचे कल्याण एवढीच संकुचित दृष्टि त्यांना असते. कामगारांचे तसे नाही. समाजातला प्रत्येक अन्याय, जुलूम, विषमता, पाशवी सत्ता नष्ट करणे यासाठीच कामगारांचा अवतार आहे (१.४२). धार्मिक, सामाजिक, कसलाही जुलूम ते सहन करणार नाहीत. धर्माचे तत्त्वज्ञान, वंशश्रेष्ठतेचे तत्त्वज्ञान या सर्व कल्पना भांडवलशाहीने जनतेला फसविण्यासाठी, तिला अधिकच दास्यात गुंतविण्यासाठी, तिची क्रांतिवृत्ती नष्ट करण्यासाठी पसरविलेल्या आहेत, हे फक्त कामगारच जाणतात. आणि म्हणूनच ते साम्राज्यशाहीचे कट्टे वैरी झालेले असतात. क्रांतीचे नेतृत्व करण्याचे त्यांना सामर्थ्य आलेले असते ते यामुळेच. पण १९३९ साली इटालियन व जर्मन कामगारांच्या ध्यानात हा आपला श्रेष्ठ गुण आला नाही. व ते दोघेही आपापल्या साम्राज्यशाही फॅसिस्ट सरकारच्या मागे निष्ठावंत सेवकांसारखे उभे राहिले. जर्मनीत १९३० सालापासून १९४५ साली युद्धात पराभव होईपर्यंत मार्क्सवादाने अत्यंत गर्हणीय ठरविलेल्या तत्त्वज्ञानाचा वंशश्रेष्ठता, राष्ट्रभावना, साम्राज्यविस्तार, आक्रमक राष्ट्रवाद, यांचा- नंगा नाच चालू होता. पण अत्यंत वर्गजागृत, अनुभवी, मार्क्सवादात मुरलेले आणि संघटनाकुशल असे तेथले कामगार जर्मन समाजाचे नेतृत्व करू शकले नाहीत. अत्यंत निष्ठेने वंशश्रेष्ठतेच्या कल्पना आत्मसात करून ते हिटलरच्या मागे उभे होते. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका येथे दण्डसत्ता प्रस्थापित झाली नाही. पण तेथे कम्युनिस्टप्रणीत क्रान्तीही झाली नाही. ब्रिटनमध्ये तर निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष