पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

तेव्हापासून पश्चिम युरोपातल्या देशांतील कासगारांना कम्युनिझमचे, आंतरराष्ट्रीय भावनेचे व नेतृत्वाचे शिक्षण दिले जात होते. लेनिनने हे कार्य अगदी थेट १९१४ पर्यंत युद्ध सुरू झाल्यानंतरही चालविले होते.
 इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका ही औद्योगिक दृष्ट्या अत्यंत प्रगत अशी राष्ट्रे होती. पहिल्या तीन देशांत मार्क्स व एंगल्स यांनी स्वतःच कार्य केले होते. आणि आपल्या अनेक भाषणांतून तेथील कामगारवर्गाला त्यांनी अनेक प्रशस्तिपत्रे दिलेली होती. इंग्लंडमधील कामगारवर्ग हा तर औद्योगिक क्रान्तीचा पहिला पुत्र. तो अत्यंत वर्गजागृत, संघटित व नेतृत्वगुणांनी संपन्न असा होता. जर्मन, फ्रेंच कामगारांची थोडीफार याच शब्दात मार्क्सने स्तुती केली आहे. फ्रेंच कामगारांनी तर १८७० साली क्रांती घडवून एक दोन महिने आदर्श समाज निर्माणही केला होता. तो ७२ दिवसच टिकला हे खरे. पण क्रांतीचा प्रत्यक्ष अनुभव तेथील कामगारांना मिळाला होता, हे आपण विसरता कामा नये. असे असल्यामुळे कम्युनिस्ट क्रांती प्रथम या देशात होणार असे भविष्य मार्क्सने वर्तविले होते. तात्पर्यार्थ असा की महायुद्धात पडलेल्या ब्रिटन फ्रान्स, जर्मनी इ. देशांतील कामगारवर्ग क्रांतीला अवश्य त्या सर्व गुणांनी १९ व्या शतकाच्या अखेरीलाच संपन्न झालेला होता.
 अशा या कामगारवर्गाने पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा काय केले ? त्याने मार्क्सवादाला शोभेसे काहीही केले नाही. त्या त्या देशातील कामगार, क्रांतीचा विचारही मनात न आणता, लेनिनचा संदेश दुसऱ्या कानाने सोडून देऊन राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपल्या साम्राज्यशाही सरकारच्या सैन्यात देशातल्या इतर नागरिकांच्या इतक्याच आवेशाने लढू लागले. आणि शेवटपर्यंत लढत राहिले. या देशांतून मार्क्सच्या संस्था स्थापन झाल्या होत्या, कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती, कामगारांच्या चळवळी कार्य करीत होत्या, असा वासही युद्ध संपेपर्यंत आला नाही. युद्ध संपल्यावर वर्ष सहा महिने मार्क्सवादी उठावणीची थोडी लक्षणे दिसू लागली होती. पण ती खोटी होती. आणि ती थोड्याच अवधीत नाहीशी झाली. १८६४ पासून पन्नास वर्षे मार्क्स, एंगल्स, लेनिन, रोझा लक्झेंबर्ग इ. नेते या कामगारांना शिक्षण देत होते. त्यांना क्रांतीचे नेते, आघाडीचे पथक इत्यादी पदव्यांनी गौरवीत होते. पण त्यांनी नेतृत्व केले नाही. आणि आश्चर्य असे की त्यानंतर पंचवीस वर्षांनी