पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
वैयक्तिक व सामाजिक

वर्ग, शेतकरी, व्यापारी यांना असाध्य असलेली क्रांती आपण करणार आहो, आपल्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य आहे अशा मार्क्सप्रणीत भ्रमात कामगार राहिला तर रशियातल्या प्रमाणेच त्याची सर्वत्र स्थिती होईल अशी भीती वाटते.
 कामगारांच्या ठायी खरोखरच असे काही अद्भुत सामर्थ्य असते तर ती मोठी भाग्याची गोष्ट होती. पण दुर्दैवाने तसे नाही हे गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासाकडे पाहताच सहज ध्यानात येईल. ते ध्यानी येऊन मार्क्सनिर्मित गंधर्वनगरीतून वास्तव जगात कामगारांनी उतरणे त्यांच्याच हिताच्या दृष्टीने अवश्य आहे.
 १९१४ साली युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले. त्या वेळी युरोपातल्या कामगारांकडून मार्क्सवादाच्या काय अपेक्षा होत्या व त्या त्यांनी कितपत खऱ्या केल्या हे पाहणे उद्बोधक होईल. हे महायुद्ध म्हणजे लेनिनच्या मते साम्राज्यशाही युद्ध होते. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन- कोणचाही देश घ्या. तेथल्या भांडवलदारांनी हे युद्ध पेटविले होते. आपापल्या साम्राज्याचे रक्षण व विस्तार हा त्यांचा स्वार्थी हेतू त्यामागे होता. त्यात कोणाचाही जय झाला असता तरी कोणच्याही देशातल्या कामगारवर्गाचा काहीच फायदा व्हावयाचा नव्हता. म्हणून १९१२ साली व त्याच्याही आधीपासून लेनिनने युरोपांतल्या कामगारांना असा आदेश दिला होता की युद्ध सुरू होताच प्रत्येक देशातील कामगारवर्गाने आपल्या देशाच्या सरकारचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (४-४६). सरकारशी सहकार्य करून कामगारांनी युद्धात सामील होणे हे तर सुतराम् वर्ज्य होते. कारण राष्ट्रनिष्ठा ही संकुचित भावना आहे. कामगारांचे दुःख हे जागतिक दुःख आहे. इंग्लिश कामगाराला इंग्लिश भांडवलदार हा जवळचा नाही. तोच त्याचा शत्रू आहे. जर्मन, फ्रेंच कामगार हा त्यांचा मित्र आहे. फ्रेंच कामगारांचा हाच दृष्टिकोन असला पाहिजे. राष्ट्रभावनेला त्यांनी बळी पडता कामा नये. त्यांना आंतरराष्ट्रीय दृष्टी असली पाहिजे. याच हेतूने मार्क्सने १८६४ साली प्रथम आंतरराष्ट्रीय कामगार संघ (फर्स्ट इंटरनॅशनल) स्थापना केला होता. तो मोडल्यावर पुन्हा १८८९ साली सेकंड इंटरनॅशनलनची स्थापना त्याच्या अनुयायांनी केली होती. आणि